Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठीच्या खर्चावर विरोधकांचा आक्षेप!

CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेसंदर्भात जनजागृतीसाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्नदेखील केले जात आहेत. मात्र, आता या योजनेसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या केवळ प्रसिद्धीसाठी जवळपास २०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा मुद्दा आता चर्चेत आला असून विरोधकांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट शासनाचा आदेशच एक्सवर शेअर करून सताप व्यक्त केला आहे.

काय आहे शासकीय आदेशामध्ये?

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या शासन आदेशामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ प्रसिद्धीसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपये मंजूर करण्यात आल्याचं नमूद केलं आहे. तसेच, या निधीचा वापर योजनेच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमांवर कसा करावा, याबाबतचा तपशीलही देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधून माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी आराखड्यावर काम करावं, असं या आदेशात म्हटलं आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

“प्रचार व प्रसिद्धीसाठी मिडिया प्लॅनिंग करणे, व्हिडीओ व ऑडिओ जाहिरातींचे क्रिएटिव्ह, इतर माध्यमांवरील प्रसिद्धीचा मजकूर यासंदर्भातली कार्यवाही नियमानुसार करावी. ही प्रसिद्धी विहीत नियमांनुसार होईल याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. या जाहिरातींचं नियंत्रण व पर्यवेक्षण महिला व बाल विकास विभागानं करावं”, असं शासकीय आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

“विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशीसुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत सहभागी पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी हे सरकार किती तत्पर आहे, असेच म्हणावे लागेल”, असंही विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी

“हे महाराष्ट्राला विकायलाही कमी करणार नाहीत”

“ह्या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत. पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातींसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे. येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही”, असं टीकास्र विजय वडेट्टीवार यांनी सोडलं आहे.

काँग्रेसनं पैशाच्या उधळपट्टीवर केली टीका

दरम्यान, काँग्रेस नेते व राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. “जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे”, असा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.