Loksatta Exclusive: “पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”; रोहित पवारांचे रोखठोक मत

तुम्हा दोघांमध्ये मतभेद होते का?, या प्रश्नालाही रोहित यांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासंदर्भात पहिल्यांदाच दिलखुलासपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पार्थ पवार यांच्यासोबत असणारं त्याचं नातं आणि पार्थ पवार यांच्या स्वभावासंदर्भात बोलताना, “पार्थ मनाने खूप चांगला आहे, पण निर्णय घेताना कधीकधी अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो,” असं म्हटलं आहे.

आठवणीत रमले रोहित पवार

पार्थ पवार यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत?, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित यांनी, “चांगलेच आहेत. माझा भाऊ आहे. मी त्याच्यापेक्षा थोडासा वयाने मोठा आहे. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळायला जायचो, कधी ट्रॅक्टरमधून फिरायला जायचो. दिवाळी यायची तेव्हा अजितदादा आमच्यासाठी पोतं भरुन फटाके आणायचे. मग आम्ही सर्व भावंड दिवाळीला एकत्र जामयचो तेव्हा ते फटाके वाटून घ्यायचो आणि नंतर एकत्र फोडायचो,” अशा जुन्या आठवणी सांगितल्या.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”

“पार्थ मनाने चांगला पण कधीकधी तो…”

पार्थ कसा आहे?, या प्रश्नाला उत्तर देताना रोहित यांनी, “पार्थबद्दल बोलायचं झालं तर तो मनाने फार चांगला आहे. निर्णय घेताना कधीकधी तो अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न तो करतो. पण आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत विनोद करणं. भावंडं म्हणून एकमेकांची चेष्टा मस्करी करणं, हे सारं आम्ही करत असतो,” असं उत्तर दिलं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

तुम्हा दोघांमध्ये मतभेद होते का?

मध्यंतरी तुमच्या दोघांमध्ये मतभिन्नता झालेली. त्यानंतर कधी बसून बोललात का तुम्ही?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “आमच्यात मतभिन्नता असल्याचा प्रचार प्रसारमाध्मयांनी केला होता. प्रसारमाध्यमांना पण बातम्या देणारे कदाचित विरोधक असतील. विरोधकांकडून त्या पुड्या सोडण्यात येत होत्या. व्यक्तीगत स्तरावर आम्हाला दोघांना ठाऊक आहे आमचं नातं कसं आहे,” असं रोहित म्हणाले.

“पार्थ मावळमध्ये सक्रीय आहे पण…”

पार्थ यांनी राजकारणामध्ये सक्रीय व्हावं असं वाटतं का?, या प्रश्नाला उत्तर देताना पार्थ हे सक्रीय असल्याचं रोहित म्हणाले. “पार्थ पवार हे सक्रीय असतात. मावळ मतदारसंघामध्ये फिरत असतात. तिथले पदाधिकारी, आपला आमदार त्या ठिकाणी आहे. जेव्हा त्यांना एखादी अडचण येते किंवा काही विषय अजित पवारांपर्यंत न्यायचे असतात तर त्या ठिकाणी पार्थ पुढाकार घेतो. काम होणं महत्वाचं आहे. काहीजण सोशल नेटवर्किंगवर सक्रीय असतात. काम जास्त हायलाइट करुन दाखवत असतात. तो दाखवत नसले. प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते,” असं पार्थ यांच्या कामासंदर्भात बोलताना रोहित यांनी सांगितलं.