आता ब्राझीलला हवीय सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाची निर्मिती असणारी ‘कोव्हिशिल्ड’ लस
भारतामध्ये उद्यापासून म्हणजेच १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. भारतामध्ये करोनाच्या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा समावेश आहे. भारताकडे अनेक देशांनी करोना लसींची मागणी केली आहे. मात्र सरकारने सध्या करोना लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. अद्याप भारताने करोना लसीच्या निर्यातीचे धोरण ठरवलेलं नसतानाच ब्राझीलने मात्र करोनाच्या लसी घेऊन जाण्यासाठी विशेष विमान भारतात पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.
बुधवारी ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अजुल एअरलाइन्सचे विमान एअरबस ए ३३० नियो मुंबईकडे उड्डाण करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. या विमानामध्ये करोनाच्या लसी ब्राझीलमध्ये आणण्यासाठी विशेष सोय करण्यात आल्याची माहिती ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाची निर्मिती असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’च्या २० लाख लसी घेऊन हे विमान थेट ब्राझीलमध्ये येणार असल्याची घोषणाही ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलीय. मात्र भारताने अद्याप करोनाच्या लसी परदेशात निर्यात करण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. ब्राझीलने पाठवलेलं विमान शुक्रवारी म्हणजे आत भारतामध्ये उतरण्याची शक्यता होती असं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र भारताच्या भूमिकेनंतर या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर गुरुवारी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. करोना लसींचे उत्पादन आणि उपलब्धतेची चाचपणी सध्या सुरु आहे. त्यामुळे इतर देशांना या लसींचा पुरवठा करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी काही कालावधी लागू शकतो असं भारताने म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ब्राझील भारतामधील सीरम इन्स्टिटयूटकडून लसींची खरेदी करुन त्या मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “इतर देशांनी भारतीय बनावटीच्या लसी विकत घेण्यासंदर्भात बोलायचं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना लस निर्मिती आणि पुरवठ्याची भारतातील सर्व क्षमता वापरुन या संकटाला तोंड देण्यास आणि मानवतेच्या भल्यासाठी प्रयत्न केले जातील असं वक्तव्य केलं होतं. भारतामध्ये लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. त्यामुळे इतर देशांना पुरवठा केला जाण्याबद्दल आत्ताच काही ठोसपणे सांगणे घाईचे ठरेल,” असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी लसीसाठी भारताकडे मदत मागितली होती. ब्राझीलला २० लाख डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे. ब्राझीलमध्ये करोना लसीच्या मुद्द्यावरुन बोलसोनारो यांच्यावर विरोधकांनी राजकीय दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. ब्राझीलमध्ये करोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या दोन लाख ४९८ वर पोहचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या अहवालानुसार अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये ब्राझीलचा क्रमांक आहे.
ब्राझीलमध्ये सध्या चिनी बनावटीच्या करोना लसीचा वापर करण्याचा विचार सुरु आहे. मात्र सिनोव्हॅक बायोटेकची निर्मिती असणारी ही करोनाची लस केवळ ५०.४ टक्के परिणामकारक असल्याचे ब्राझीलमधील क्लिनिकल ट्रायलमध्ये समोर आलं आहे. या लसीसंदर्भात ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये पूर्वी ही लस जितकी प्रभावशाली वाटली होती त्यापेक्षा ती नक्कीच कमी परिणामकारक आङे. त्यामुळे या लसीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. चिनी लसीचा फारसा परिणाम दिसत नसल्यानेच ब्राझीलने सीरमशी करार केला असून आता त्यांनी तातडीने २० लाख लसींची मागणी केलीय. मात्र जोपर्यंत भारत सरकार लसीच्या निर्यातीला परवानगी देत नाही तोपर्यंत या लसींचा पुरवठा ब्राझीलसाठी रवाना करता येणार नाही.