राज्यातील करोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
राज्यात दिवसेंदिवस करोनामुळे परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नवे करोनाबाधित सापडण्याचं प्रमाण वाढलेलं असताना आता Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील मोठी वाढ दिसू लागली आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल २२७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या रोजच्या अहवालानुसार या मृतांसोबत राज्याचा मृत्यूदर १.९४ टक्के इतका झाला आहे. त्याचसोबत दुसरीकडे ३९ हजार ५४४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. आज दिवसभरात २३ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी राज्याचा एकूण Recovery Rate ८५.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हळूहळू राज्य सरकारची चिंता आणि करोनाचा पुन्हा वाढता फैलाव रोखण्याचं आव्हान अशा दोन्ही गोष्टी अधिकाधिक तीव्र होऊ लागल्या आहेत.
आजचे सर्वाधिक मृत्यू पुण्यात!
राज्यात आज झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक ३१ मृत्यू हे नागपूरमध्ये झाले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात १८ मृतांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये हा आकडा १५वर गेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मृतांची एका आकड्यावर असणारी संख्या आता दोन आकड्यांवर जाऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ६९० वर गेला आहे. तर राज्यातील एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ इतका झाला आहे.
राज्यात आजघडीला एखूण २८ लाख १२ हजार ९८० करोनाबाधितांची नोंद असून त्यापैकी ३ लाख ५६ हजार २४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राजेश टोपेंचा सूचक इशारा!
राज्यातील करोनाची परिस्थिती पाहाता राज्य सरकारकडून वारंवार नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. बुधवारी सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील “कठोर निर्बंधांची मानसिक तयारी करून ठेवा”, असा सूचक इशारा दिला आहे. या परिस्थितीमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करावा की नाही, याविषयी सत्ताधारी आणि विरोधकांप्रमाणेच जनतेमध्ये देखील वेगवेगळी मतं पाहायला मिळत असली, तरी करोनाचा वाढता फैलाव पाहाता कठोर निर्बंध लादण्याची तयारी राज्य सरकारने केल्याचं चित्र दिसून येत आहे.