बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपच्या ताब्यात असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या सातही विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून प्रत्येकी एक शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपच्या ताब्यात असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांनी सत्ताधारी महायुतीला नाकारले. जनाधार विरोधात गेल्याने त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते सध्या जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात महायुतीकडे संपूर्ण सात जागा असल्या तरी भाजपच्या पाच जागांवर कालपर्यंत विजयाची खात्री कोणीच देत नव्हते. मात्र हरियाणातील भाजपचा विजय आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मिळालेले यश यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निकालांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विजयाबद्दलचा विश्वास दुणावला आहे.
आतापर्यंत शांत असलेले स्थानिक भाजप महायुतीचे कार्यकर्ते आता आक्रमकपणे ही निवडणूक बहुमताने जिंकण्याची भाषा करत आहे. २०१४ मध्ये भाजपने जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार केली. २०१९ मध्येही तोच कित्ता गिरवला. त्यामुळे २०२४ ची निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. पंरतु, यावेळी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीतील आजचे घटकपक्ष स्वतंत्रपणे लढले होते. यावेळी उमेदवारीपासूनच मारामार सुरू होणार आहे. महायुतीत सातपैकी पाच जागा भाजपकडे, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एक शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे महायुतीचा ‘फॉर्म्युला’ पाच अधिक एक अधिक एक असा राहणार आहे.
महाविकास आघाडीत उमेदवारीवरून गोंधळ!
उमेदवारीसाठी खरा गोंधळ महाविकास आघाडीत होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच्या निवडणुका हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) हे तिन्ही पक्ष प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगत आहेत. पूर्वी पुसद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कुठेही यश आले नाही. शिवसेनेतही दिग्रस, वणी वगळता कुठे यश आले नाही. काँग्रेसने मात्र बहुतांश सर्वच मतदारसंघाचे नेतृत्व यापूर्वी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिकीट वाटपाचा ‘फॉर्म्युला’ कसा राहतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजप कोणती खेळी खेळणार? सत्ताधारी, विरोधी पक्षातील उमेदवारांचा खरा कस हा यवतमाळ, वणी, केळापूर, उमरखेड, राळेगाव या मतदारसंघात लागणार आहे. दिग्रस आणि पुसद हे बंजाराबहुल मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात सत्ताधारी आमदारांना पोषक वातावरण आहे. उमरखेड हा अनुसूचित जाती तर राळेगाव आणि केळापूर हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यवतमाळ मतदारसंघात जात प्रवर्गानुसार मतांचे विभाजन करण्यात भाजपला यश आल्याने मागील दोन निवडणुकीत त्यांना यश मिळाले. यावेळी मात्र वातावरण बदलले आहे. त्यामुळे येथे भाजप मत विभाजनासाठी काय खेळी खेळणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.