2024 Maharashtra Lok Sabha Election Result Updates : उबाठा गटाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून त्यांचे तीन खासदार निवडून आले आहेत. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. तर विशाल पाटील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीला केवळ १७ जागा मिळू शकल्या आहेत. मुंबईतही उबाठा गटाने जोरदार कामगिरी केली असून चार पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन पैकी एका जागेवर विजय मिळविला आहे. मुंबईत महायुतीचे पानिपत झाल्यानंतर आता मनसेकडून यावर भाष्य करण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट टाकत उबाठा गटाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संदीप देशपांडे एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “उ.बा.ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे.” मुंबईत झालेला पराभव हा महायुती आणि मनसेच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला, असा दावा मनसेचे दुसरे नेते गजानन काळे यांनी केला होता. मात्र राज ठाकरे यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरही सभा घेतली होती. पंतप्रधान मोदींसह महायुतीचे अनेक बडे नेते या सभेला उपस्थित होते, तरीही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नेते अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. दादरचा भाग याच मतदारसंघात येतो.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उबाठा गटावर हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचा प्रचार करण्यात आला. बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा केल्याचे म्हटले जात होते. एवढेच नाही तर लोकसभेच्या प्रचारावेळी उबाठाच्या सभेत अनेक मुस्लीम लोक उपस्थित असल्याचा मुद्दाही भाजपा आणि शिंदे गटाने उपस्थित केला होता. त्यावरून मुस्लीमांचा यावेळी शिवसेनेला पाठिंबा असल्याचे चित्र दिसत होते.
उत्तर पश्चिम मुंबईचे उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारफेरीत बॉम्बस्फोटातील आरोपाचा सहभाग असल्याचाही आरोप भाजपाने केला होता. उबाठा गटाला नकली शिवसेना म्हणूनही संबोधले गेले. पण मतदारांनी दिलेला कौल आता सर्वांसमोर स्पष्ट आहे.
उबाठा गटाला २१ पैकी ९ जागांवर विजय
शिवसेना उबाठा गटाला जागावाटपात २१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांनी ९ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसने १७ जागांपैकी १३ जागांवर घसघशीत यश मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने १० पैकी ८ जागांवर जोरदार विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे दिसले.