Maharashtra Politics Live Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचे प्रत्येक अपडेट वाचा, एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Live Updates, 22 October 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच मनसेच्या उमेदवारांचीही यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व घडामोडींसह राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.
“फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप
पुण्यातील खेड-शिवापूर भागात पोलिसांनी एका गाडीतून पाच कोटींची रोख रक्कम जप्त केले आहेत. ही गाडी एका सत्ताधारी आमदाराची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, “पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की, मी आआधी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत. त्यातील हा १५ कोटींचा पहिला हप्ता जात होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.