Maharashtra Unseasonal Rain : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतपिकांचंही मोठं नुकसान

Rain in Maharashtra : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.

Weather Alert, Mumbai-Pune Unseasonal Rain : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक आणि जळगावमधील बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नाशिकमध्ये द्राक्षांची झाडं कोसळली असून पिकांच मोठं नुकसान झालं आहे. येवल्यात काढणीस आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे. तर तीन एकर कांदादेखील भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊन झाल्याने केळी आणि गहू या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय पालघरमध्येही गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंब्यासह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागातही गारपीट झाल्याने कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर