Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

Olympic 2024 Updates शांत आणि संयमी मानसिकता राखत भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने मंगळवारी भारतीय क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला.

पीटीआय, चॅटॅरॉक्स (फ्रान्स)

Olympic 2024 Updates शांत आणि संयमी मानसिकता राखत भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने मंगळवारी भारतीय क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला. सरबज्योतच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवताना मनूने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळविण्याची कामगिरी केली.

ऑलिम्पिकच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत अशी कामगिरी करणारी मनू पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात १९०० मध्ये नॉर्मन पिचार्ड या धावपटूने २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्याचेच नाव घेतले जाते. दोन दिवसांपूर्वी वैयक्तिक कांस्यपदक मिळविल्यानंतर मनू मंगळवारी मिश्र सांघिक गटात सरबज्योतच्या साथीत तेवढ्याच आत्मविश्वासाने उभी राहिली. मनू-सरबज्योतने कोरियाच्या ली वोनोहो आणि ओह ये जिन जोडीचा १६-१० असा पराभव केला

हे वाचले का?  Supreme Court : बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना ‘ओळख’ मिळणार? कलम 6 A बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी काय?

देशातील महिला खेळाडू आणि नेमबाजांसाठी ही एक मोठी उपलब्धी असताना सरबज्योतसाठी देखील हे पदक खास ठरले. कुमार गटापासून चमक दाखवणाऱ्या सरबज्योतने ऑलिम्पिकच्या पदार्पणात शनिवारी वैयक्तिक पदकासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र, त्याला ५७७ गुणांसह नवव्या स्थानावर राहावे लागले होते. एका दिवसाच्या अंतराने दुसरे कांस्यपदक मिळविल्यावर मनूचा चेहरा अधिक उजळून निघाला होता. तिला आपला आनंद लपवता येत नव्हता. ‘‘एकाच स्पर्धेत भारतासाठी दोन पदके मिळवू शकले याचा मला अभिमान वाटतो. मला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल सदैव सर्वांची ऋणी राहीन,’’ असे मनूने सांगितले. ‘‘प्रतिस्पर्ध्यांचे नियोजन काय असेल, ते कसे खेळतील याची काहीच कल्पना नसते. आपल्या हातात असते तेवढे सर्वोत्तम प्रयत्न आपण करायचे असतात. शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार होता व अखेरपर्यंत लढत दिली. त्याचे फळ मला मिळाले,’’ असेही मनू म्हणाली.

भारताची सुरुवात खराब झाली होती. सरबज्योतला सुरुवातीला ८.६ गुणांचाच वेध घेता आला. मनूने मात्र १०.२ गुणांचा वेध घेतला. कोरियन जोडीने मात्र २०.५ गुणांसह फेरी जिंकून आघाडी घेतली. मिश्र दुहेरीत सर्वात प्रथम १६ गुणांची कमाई करणारी जोडी विजयी ठरते. पहिल्या फेरीतील अपयशाने जणू मनू प्रेरित झाली आणि कमालीच्या अचूकतेने लक्ष्य भेद करताना कोरियन जोडीवरील दडपण वाढवले. या वेळी सरबज्योतची देखील सुरेख साथ मिळाली. भारताने ८-२ अशी आघाडी घेतली आणि कधीच मागे वळून बघितले नाही. मनूच्या अचूकतेमुळे भारतीय जोडीला सर्वात आधी १६ गुणांची कमाई करता आली.

हे वाचले का?  Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी

राणांच्या मार्गदर्शनाखाली मनूचा आत्मविश्वास दुणावला राम किशन

पिस्तूल नेमबाज मनू भाकरने पुन्हा एकदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरिसमध्ये आपल्या मुलीच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत, असे मनूचे वडील राम किशन म्हणाले. ‘‘माझ्याकडे शब्द नाहीत.जसपाल हे आपल्या काळातील नामांकित नेमबाज होते. ते पुन्हा मनूसोबत आले तेव्हा तिचा आत्मविश्वास दुणावला. मनूचे प्रयत्न व जसपाल यांच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाले आहे,’’ असे मनूच्या वडिलांनी सांगितले.

हे वाचले का?  Lockdown Effect on Moon : पृथ्वीवरील ‘कोविड लॉकडाउन’मुळे चंद्राच्या तापमानात घट; अभ्यासातील निष्कर्ष

प्रत्येक गोष्टीवर आपण नियंत्रण राखू शकत नाही. त्यामुळे केवळ सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक शॉट्समध्ये आमची सर्वोत्तम ताकद दिली. खूप आनंदी आहे. – मनू भाकर

वैयक्तिक प्रकारात अपयश आल्याने कमालीचा निराश होतो. लढतीसाठी उतरलो तेव्हा खूप दडपण होते. मनूच्या आत्मविश्वासाने धीर आला. एका ऑलिम्पिक पदकाचा आणि त्याचवेळी दुसऱ्या ऐतिहासिक पदकात योगदान देऊ शकलो याचा अभिमान वाटतो.- सरबज्योत सिंग