Meta Layoff: ट्विटरनंतर आता ‘मेटा’मधून नोकरकपातीची शक्यता, आठवड्याभरात एक हजार जणांच्या नोकऱ्या जाणार?

या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती

फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटा’मधून कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठवड्याभरात या कंपनीतून जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, असं वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं दिलं आहे. मेटाचे जगभरात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसह विविध प्लॅटफॉर्म्सवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांमध्ये २०२३ या वर्षाच्या शेवटपर्यंत वाढ करण्यात येणार नाही, असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली होती. २०२३ या वर्षामध्ये कंपनीचा गुंतवणुकीवर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

तिसऱ्या तिमाहीत मेटाचा नफा घसरून ४.४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. नफा ५२ टक्क्यांनी घसरल्यानंतर आता या कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना डच्चू मिळणार आहे. मेटाच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारमूल्य ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

ट्विटरमधून ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात

एलॉन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क मिळताच जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ट्विटरने गेल्या आठवड्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कपातीमध्ये भारतातील २३० पैकी १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कपात ट्विटरच्या सर्वच विभागांमध्ये करण्यात आली आहे.

हे वाचले का?  पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष