राजीनामा देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचाही समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सध्याच्या मोदींच्या मंत्रीमंडळातील महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती. याचबरोबर राजीनामा देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातून कोणाला संधी?
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागण्याची चिन्हे. महाराष्ट्रामधून नारायण राणेंबरोबरच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. हिना गावित यांचे वडील विजय कुमार राष्ट्रवादीमध्ये होते आणि ते राज्यात मंत्री होऊन गेले आहेत. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा आहे.
यांनाही संधी मिळण्याची शक्यता….
आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, जनता दलाचे (संयुक्त) लल्लन सिंह व आरसीपी सिंह, भाजपाच्या रिटा बहुगुणा-जोशी, पंकज चौधरी, रामेश्वर कथेरिया, वरुण गांधी, सी. पी. जोशी, राहुल कासवान तसेच ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल आदी नेतेही मंगळवारी राजधानीत आले असून, या नेत्यांशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे समजते. काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये गेलेले जितीन प्रसाद तसेच, तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे दिनेश त्रिवेदी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
समिकरण कसं?
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना डच्चू मिळाल्याने आता केंद्रीय मंत्रिमंडळात ५२ मंत्री असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी २९ मंत्र्यांची नियुक्ती करता येऊ शकते. लोकसभा सदस्यांच्या १५ टक्के जागांइतकी मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार असून, १७-२२ नव्या मंत्र्यांना संधी मिळू शकेल. शिवसेना, अकाली दल यासारखे घटक पक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडल्यानंतर रामदास आठवले वगळता सर्व मंत्री भाजपाचे आहेत. मोदी सरकारमधील फेरबदलामध्ये जनता दल (सं), लोक जनशक्ती, अपना दल आदी घटक पक्षांना सामावून घेतले जाणार आहे.
२०२४ च्या दृष्टीकोनातून विचार…
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला उपयुक्त ठरू शकतील अशा नेत्यांचा मंत्रिपदी विचार केला जात असून गेले काही आठवडे मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शिवाय, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आदी मंत्र्यांकडील अतिरिक्त खातेभारही कमी होऊ शकेल. काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांची मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
सविस्तर वृत्त लवकरच…