मुंबई – नाशिक प्रवास लवकरच सुकर

मुंबई – नाशिक प्रवास लवकरच सुकर
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 5 मिनिट )

मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे – ठाणे महामार्गाच्या रूंदीकरणासह क्राँक्रीटीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून करीत आहे. हे काम याआधीच पूर्ण होऊन वडपे – ठाणे महामार्ग सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला. पण आता मात्र या प्रकल्पाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत प्रकल्पाचे ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग सेवेत दाखल करण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पातील कशेळी आणि कळवा खाडीपूल जानेवारीअखेरीस पूर्ण करून ते फेब्रुवारीच्या सुरूवातीस सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हे दोन्ही खाडीपूल सेवेत दाखल झाल्यास मुंबई-नाशिक महामार्गावरील ९० टक्के वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघून प्रवास सुकर होईल, असा दावा यानिमित्ताने एमएसआरडीसीकडून केला जात आहे.

एनएचएआयने २०२९ मध्ये २३.५ किमी लांबीच्या वडपे – माजीवडा, ठाणे महामार्गाच्या रूंदीकरणासह काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली. मात्र हे काम मार्गी लावण्यात यश न आल्याने २०२१ मध्ये एनएचएआयने कंत्राटदार म्हणून या कामाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे दिली. तर एमएसआरडीसीला पर्यावरण परवानगी घेऊन कामाला सुरूवात करण्यास २०२२ उजाडले. त्यानंतर कामाला सुरूवात झाली. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम पूर्ण झाले नसल्याने मुंबई-नाशिक प्रवास प्रवासी-वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या प्रकल्पास विलंब होत असल्याने लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त केली जात असून काही महिन्यांपूर्वी याप्रकरणी एमएसआरडीसीतील एका अधिकाऱ्याला निलंबित करावे लागले होते.

See also  माजी आमदार भोसले, पांडे, वाघ, पाटील, खैरेंचा भाजपमध्ये प्रवेश

आता मात्र या प्रकल्पाने वेग घेतला असून प्रकल्पाचे एकूण ८१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. काँक्रीटीकरणाच्या कामातील २३.८० किमीपैकी १९.२७ किमीचे अर्थात ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्चअखेरीस पूर्ण केले जाणार आहे. तर १८.३५ किमीच्या सेवा रस्त्यापैकी १६.१० किमीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. ८८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्चअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

वडपे – ठाणे महामार्गातील वडपे उड्डाणपुलाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून १०० टक्के काम जानेवारीअखेरीस पूर्ण केले जाणार आहे. रेल्वे पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्चअखेरीस पूर्ण केले जाणार आहे. त्याचवेळी कशेळी खाडीपुलाचे ९२ टक्के, तर कळवा खाडीपुलाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन्ही खाडीपुलांचे काम जानेवारीअखेरीस पूर्ण करून ते फेब्रुवारीच्या सुरूवातीला सेवेत दाखल केले जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. हे खाडीपूल सुरू झाल्यास मुंबई-नाशिक महामार्गावरील ९० टक्के वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावाही यानिमित्ताने केला आहे.

See also  नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

दरम्यान, येवई फुयारी मार्गाचे, वालशिंद भुयारी मार्गाचे, सोनाळे भुयारी मार्गाचे,सरवली भुयारी मार्गाचे, पिंपळास भुयारी मार्गाचे आणि मोटागाव मानकोली भुयारी मार्गाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे भुयारी मार्ग एप्रिलच्या सुरूवातीला सेवेत दाखल होतील. दिवेगाव भुयारी मार्ग, दिवे भुयारी मार्ग आणि खारेगाव भुयारी मार्गाचे प्रत्येकी ६३ टक्के, ६७ टक्के आणि २६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम फेब्रुवारी – मार्चदरम्यान पूर्ण केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. संपूर्ण महामार्ग एप्रिलच्या सुरूवातीला सेवेत दाखल झाल्यास नाशिक आणि समृद्धी महामार्गावरून ठाण्याला अतिजलद येता येणार आहे. तर नाशिक-मुंबई महामार्गावरील आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.