मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. या कामासाठी उद्या पासून (१५ डिसेंबर) पुढील चार महिने खारेगाव भुयारी मार्गासाठी वाहतुक बदल असणार आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
भिवंडी, कळवा, ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी हजारो वाहने मुंबई नाशिक महामार्गाचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे कार्य एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या कामाचा भाग म्हणून येथे आता काही महत्त्वाची कामे केली जाणार आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.
- मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्गाने खारेगावच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका, गॅमन रोड, पारसिक चौक मार्गे वाहतुक करतील. किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे वाहतुक करतील.
- खारेगाव भुयारी मार्गे मुंबई नाशिक मार्गावरून भिवंडी किंवा ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव, पारसिक चौक, गॅमन रोड मार्गे तर ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने कळवा खाडी पूल मार्गे वाहतुक करतील.
ठाणे वाहतुक नियंत्रण विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार हे वाहतुक बदल उद्या, १५ डिसेंबरपासून लागू होणार आहे. तर ९ एप्रिल २०२६ पर्यंत २४ तास वाहतुक बदल कायम असतील. त्यामुळे पुढील चार महिने खारेगाव भुयारी मार्गाचा वापर चालकांना करता येणार नाही.


