NASHIK FIRST तर्फे दोन लाख जणांना सुरक्षित वाहतूक प्रशिक्षण

मुंबई नाका येथील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: रस्ते अपघातांत दरवर्षी जीव गमावणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. वाहन चालविताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक फर्स्ट संस्थेने साकारलेल्या ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’मध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी आजवर तब्बल दोन लाख नागरिकांना प्रशिक्षित करण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे. या निमित्त शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई नाका येथील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. काही वर्षांपूर्वी उद्योग क्षेत्रातील १० ते १२ जणांनी एकत्र येत शहराचा विकास, संपर्क, सुरक्षित वाहतूक आदी विषयांवर काम करण्यासाठी ॲडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशन, नाशिक फर्स्ट या सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्या अंतर्गत आठ वर्षांपूर्वी लहान मुलांना वाहतूक नियमांचे धडे देणारे हे अनोखे उद्यान साकारले. या ठिकाणी भ्रमंती करताना कोणत्याही रस्त्यांवर असणारी सर्वागिण स्थिती अनुभवयास मिळते. म्हणजे, उड्डाणपूल, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा, एकेरी मार्ग, पदपथ, बस थांबा, रुग्णालय, पेट्रोल पंप, रस्ता वाहतुकीचे दिशादर्शक फलक, आदेशात्मक चिन्हे, सावध करणारी चिन्हे कोणती, आदी वाहतूक नियमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा, रहदारी नियम मार्गदर्शनापासून सुरू झालेल्या प्रशिक्षणाची व्याप्ती पुढील काळात उत्तरोत्तर वाढत गेली. वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित पुस्तके, ध्वनी व चित्रफितींचा संग्रह, मोटार चालविण्याचे आभासी प्रशिक्षण देणारी यंत्रणा (सिम्युलेटर) आदींचा अंतर्भाव असणाऱ्या ‘नॉलेज हब’ची उभारणी करण्यात आली. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने रस्ते वाहतूक आणि सुरक्षा या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जात असल्याचे संस्थेचे प्रमुख अभय कुलकर्णी यांनी सांगितले.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

सर्वांना नि:शुल्क प्रशिक्षण

संस्थेने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे बसचालक, मालमोटार चालक व अन्य वाहनधारकांना मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यासाठी ‘डॉन’ उपक्रम राबविला गेला. अपघातात जखमी वा मृत होणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक असते. हे लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ वाहन परवान्यासाठी नाशिक फर्स्टमध्ये प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे चालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी अशा प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या नियोजनाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. महत्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण नि:शुल्क स्वरुपात दिले जाते. या प्रकल्पास महिंद्रा आणि लॉर्ड इंडियाने भरीव सहकार्य केले आहे. सामाजिक दायित्व निधीतून या कार्यास हातभार लागत आहे.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान