इगतपुरीत १२०० मिलिमीटर घट बहुतांश भागात दमदार पाऊस होऊनही पावसाने सरासरी न गाठण्यामागे इगतपुरी, पेठ आणि नाशिकमध्ये घटलेला पाऊस हे कारण असल्याचे लक्षात येते.
एक जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या ८०० मिलिमीटर म्हणजेच ९२.०४ टक्के पाऊस झाला आहे. या काळात जिल्ह्यात सरासरी ८६६ मिलिमीटर पाऊस पडतो. १२ तालुक्यांत त्याने सरासरी ओलांडली, मात्र तीन तालुक्यात आणि त्यातील इगतपुरीत त्याचे प्रमाण लक्षणीय घटले. याचा परिणाम मुसळधार पाऊस होऊनही अद्याप सरासरी न गाठण्यात झाल्याचे दिसत आहे.
सध्या पावसाने उघडीप घेतली असून तो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या हंगामात जुलैअखेर आणि ऑगस्टमधील सलग काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट दूर सारले गेले. पिकांची स्थिती चांगली असल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. सद्यस्थिती पाहता जिल्हा या वर्षी पावसाची सरासरी गाठेल की नाही, याबद्दल उत्सुकता आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार एक जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ८६६. ५ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा त्यात घट होऊन तो ९२.४ टक्केच झाला आहे.
जिल्ह्यात १२ तालुके खऱ्या अर्थाने जलसमृद्ध झाले. दुष्काळी, कमी पावसाच्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मालेगाव तालुक्यात आतापर्यंत ५०८ मिलिमीटर (१२२.९ टक्के), बागलाण ६०१ (१३८), कळवण ६७४ (११५.६), नांदगाव ५७३ (१३०.४), सुरगाणा १९०७ (१०६.९), दिंडोरी ९४४ मिलिमीटर (१५१.२), निफाड ४४८ (१०९.२), सिन्नर ५०३ (१०८.१ टक्के), येवला ४८३ (११९.३), चांदवड ६४३ (१३४.१), त्र्यंबकेश्वर २१२७ मिलिमीटर (१०३.१) आणि देवळा तालुक्यात ५६२ (१४९.१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
इगतपुरीत १२०० मिलिमीटर घट बहुतांश भागात दमदार पाऊस होऊनही पावसाने सरासरी न गाठण्यामागे इगतपुरी, पेठ आणि नाशिकमध्ये घटलेला पाऊस हे कारण असल्याचे लक्षात येते. इगतपुरीत आतापर्यंत सरासरी २९०३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ १७०८ मिलिमीटर म्हणजे ५८.८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. म्हणजे या तालुक्यात पावसाचे प्रमाण १२०० मिलिमीटरने कमी झाले आहे. पेठ तालुक्यात सरासरी पावसाचे प्रमाण १५ टक्क्यांनी तर, नाशिक तालुक्यात आठ टक्क्यांनी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. या ठिकाणी अनुक्रमे पेठमध्ये १६६२ मिलिमीटर (सरासरी १९२०), नाशिक तालुक्यात ५८८ (सरासरी ६४१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.