‘NEET’चा निकाल जाहीर; राज्यातील श्रीनिकेत रवी, तनिष्क भगत, रिद्धी वजारींगकर देशातील पहिल्या पन्नासमध्ये

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत.

पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) बुधवारी मंगळवारी रात्री प्रसिद्ध केला. त्यात ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्यातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ९९.९९ पर्सेंटाइल मिळवलेल्या देशातील पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील श्रीनिकेत रवीने सातवा, तनिष्क भगतने २७वा आणि रिद्धी वजारींगकरने ४४वा क्रमांक मिळवला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

एनटीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  यंदा देशभरातील ४ हजार ९७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. २० लाख८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले. तामिळनाडूच्या प्रभंजन जे आणि बोरा वरूण चक्रवर्ती यांनी संयुक्तरित्या देशात पहिला क्रमांक मिळवला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नीटसाठीच्या नोंदणीसह पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.  देशात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १ लाख ३९ हजार ९६१ विद्यार्थी पात्र ठरले. राज्यातील २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २ लाख ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. श्रीनिकेत रवीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राज्यातील आर्या पाटील, हादी सोलकर यांनी अपंग प्रवर्गातील, पलक शहाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील, आयुष रामटेकेने अनुसूचित जाती प्रवर्गातील, शिवम पाटील इतर मागास वर्ग प्रवर्गातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.