NEET 2021 Exam : परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे

१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (National Eligibility-cum-Entrance Test ) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात NEET UG परीक्षा २०२१ दुसऱ्या तारखेला घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने म्हटले होते की NEET परीक्षेचे तारीख सीबीएसई कंपार्टमेंट व अन्य परीक्षेचा तारखा सारख्या आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की NEET परीक्षा येत्या रविवारी, १२ सप्टेंबर रोजी निर्धारित वेळेवर घेतली जाईल.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

न्यायालयाने म्हटले की, NEET परीक्षेत १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, “आम्ही या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची परिस्थिती नको आहे. परीक्षा होऊ द्या.” अ‍ॅड सुमंत नकुलाने सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, शिक्षणाच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही कारण लाखो विद्यार्थी त्यांच्या आदेशामुळे प्रभावित होतील.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

याचिका फेटाळताना कोर्टाने म्हटले, “आम्हाला खरोखरच न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती निश्चित करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांनी हवं तर मध्यरात्री जागून तयारी करावी. न्यायालय म्हणून आम्ही किती हस्तक्षेप करू शकतो.”

गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.