नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल 
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 3 मिनिट )

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भविष्यातील विस्ताराला आता ठोस दिशा मिळू लागली असून, तिसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी सिडको मंडळाने अधिकृतपणे हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यात दिलेल्या संकेतांनंतर अवघ्या पाच महिन्यांत सिडकोने तिसऱ्या धावपट्टीसाठी टेक्नो-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास (टेक्नो कमर्शियल फिजिबिलिटी स्टडी) करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात नुकतीच ई-निविदा सूचना सिडकोने प्रसिद्ध केली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्या आहेत. देशातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाचा क्रमांक लागतो.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात सध्या प्रत्येकी ३७०० मीटर लांबीच्या दोन धावपट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिल्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून सर्व आवश्यक परवानग्या व चाचण्या झाल्यानंतर याच धावपट्टीवरून आगामी नाताळच्या सुमारास देशांतर्गत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या धावपट्टीचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिडको मंडळ व अदानी समूहाने केले आहे. मात्र वाढती प्रवासी क्षमता, कार्गो वाहतूक आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची गरज लक्षात घेता तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता अधोरेखित होत आहे. तीसरी धावपट्टी या विमानतळात साकारल्यास मुंबई महानगर क्षेत्रातील तीन धावपट्या असलेले नवी मुंबई हे सर्वात व्यस्त विमानतळ होईल.

See also  प्रचारात ‘एआय’चा प्रभाव

याच पार्श्वभूमीवर सिडकोने “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी विद्यमान विमानतळाची जागा आणि विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील काही टेकड्या आणि जमीनीची स्थिती पाहून त्यावर तीस-या धावपट्टीची उभारणी करू शकतो का याची टेक्नो कमर्शियल व्यवहार्यता अभ्यास सल्लागाराकडून केला जाणार आहे. याच कामासाठी ” सल्लागार नियुक्त करण्यासाठी ऑनलाइन प्रस्तावाची विनंती (आरएफपी) मागवले आहेत. ही निविदा प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने राबवली जाणार असून सल्लागाराची नियुक्ती किमान खर्च निवड पद्धतीने केली जाणार आहे. या सल्लागाराला सहा महिन्यांच्या कालावधीत अभ्यास अहवाल सादर करावा लागणार आहे.

निविदा कागदपत्रे १६ डिसेंबर २०२५ पासून सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.दरम्यान, तिसऱ्या धावपट्टीच्या संभाव्य उभारणीमुळे विमानतळ गाभा क्षेत्रालगतच्या पारगाव, दापोली, खालचे ओवळे, भंगारपाडा आणि कुंडेवहाळ या गावांतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या गावांतील कुटुंबांना साडेबावीस टक्के विकसित भूखंडासह घर व इतर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील परिसरात एेरोसीटी, एज्युसीटी, मेडिसीटी, २५ हजार प्रेक्षकांचे बहुउद्देशीय बंदिस्त सभागृह (अरेना) असे विविध प्रकल्पाचे काम हाती घेतले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी पंचतारांकित हॉटेलचे भूखंड विक्रीस उपलब्ध केले आहेत. त्यामुळे नामांकित हॉटेल क्षेत्रातील कंपन्या नवी मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

See also  शहर आणि परिसरातील किमान तापमानात घट