NIA, ईडीची मोठी कारवाई! देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात

NIA Raid : देशात एनआयए आणि ईडीने मोठी छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांखाली एनआयएने पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेतलं आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) १०० सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. देशभरातील १० राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एनआयए आणि ईडीने आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या १०० सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातून दोन जणांना एनआयएने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

पीएफआय संघटनेचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या केरळमधील मांजेरी येथील घरावर सुद्धा एनआयए आणि ईडीने छापेमारी केली. मध्यरात्री ही छापेमारी करण्यात आली. यावेळी पीएफआय संघटनेच्या सदस्यांनी ओएमए सलाम घराबाहेर एनआयए आणि ईडी विरुद्ध निदर्शने केली.

दरम्यान, १८ सप्टेंबरला एनआयएच्या २३ एकूण पथकांनी आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील काही जिल्ह्यांत छापेमारी केली होती. त्यावेळी देखील बेकायदेशीर कृत्य, हिंसा भडकावणे तसेच दहशतवादी कृत्यांशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. निझामाबाद, कुरनूल, गुंटूर आणि नेल्लोर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!