लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर एनआयएचे छापे
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गँगस्टर आणि दहशतवाद संबंधांचा तपास एनआयए करत असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा गँगस्टर्सची चौकशी केल्यानंतर इतर अनेक गँगस्टर्सची नावं समोर आली आहेत. एनआयए चौकशी कऱण्यात आलेल्या गँगस्टर्सच्या घऱावर छापे टाकत असून, त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणं आणि सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले जात आहेत..
सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क आहेत. लॉरेन्स बिष्णोई आणि बावना गँगच्या नावे भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एनआयएने आतापर्यंत अटक केलेल्या सर्व गँगस्टर्सच्या चौकशीच्या आधारे पाकिस्तान-आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती जमा केली आहे. देशविरोधा कारवायांसाठी या गँगस्टर्सचा कशाप्रकारे वापर केला जात आहे, याची माहिती तपास यंत्रणा जमा करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर-दहशतवाद फंडिंग प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. याआधी एनआयएने दोन वेळा कारवाई करत १०२ ठिकाणी छापे टाकले होते.