Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

Olympics in India: नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य असून ही त्यांची दुसरी टर्म आहे.

Olympics in India: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतंच भारताच्या मनु भाकेरनं इतिहास घडवत नेमबाजीमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवला. शिवाय मनु भाकेरच्या कामगिरीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकांचं खातंही उघडलं. पण एकीकडे भारतीयांसाठी ऑलिम्पिक या कारणामुळे चर्चेत असताना दुसरीकडे राजकीय नेतेमंडळींमध्ये मात्र नीता अंबानी व कार्ती चिदम्बरम यांच्यातील दावे-प्रतिदाव्यांमुळे ऑलिम्पिकची चर्चा पाहायला मिळत आहे. नीता अंबानी यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या एका इच्छेवर कार्ती चिदम्बरम यांनी मोठं संकट असल्याची टिप्पणी केली आहे.

काय म्हणाल्या नीता अंबानी?

नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात IOC च्या सदस्य आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिसमधील इंडिया हाऊसच्या उद्घाटनावेळी त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. “आता तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी भारतात ऑलिम्पिकचं आयोजन होईल. इंडिया हाऊसच्या उद्घाटनाच्या दिवशी आपण सर्व मिळून हा संकल्प करूयात”, असं नीता अंबानी यावेळी म्हणाल्या. (Olympics in India)

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

“आज आपण पॅरिस ऑलिम्पिक गेम्स २०२४ मध्ये भविष्यातील स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यासाठी जमलो आहोत. जे स्वप्न १४० कोटी भारतीयांनी पाहिलं आहे. ते स्वप्न आहे भारतात ऑलिम्पिकचं आयोजन करण्याचं. कोणताही देश कधी ना कधी एका अशा महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, जिथे तो इतिहासाची दिशाच बदलू शकतो. भारत आता त्या टप्प्यावर आला आहे. आता वेळ आली आहे की अथेन्समध्ये जी ज्योत पहिल्यांदा पेटवली गेली होती (पहिल्या ऑलिम्पिकचं उद्घाटन), त्या ज्योतीनं भारतातील प्राचीन भूमी उजळून निघावी”, असंही नीता अंबानींनी यावेळी नमूद केलं.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

कार्ती चिदम्बरम यांची सोशल मीडियावर पोस्ट

नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ एएनआयनं एक्सवर पोस्ट केला असून त्यासंदर्भात काँग्रेस खासदार कार्ती चिदम्बरम यांनी प्रतिक्रिया देणारी पोस्ट लिहिली आहे. “एक देश म्हणून भारतात ऑलिम्पिकचं आयोजन करणं हे फार मोठं संकट ठरेल. ऑलिम्पिकसाठी आपल्याला अशा गोष्टी बांधण्यासाठी मोठा पैसा गुंतवावा लागेल, ज्याचा ऑलिम्पिकनंतर काहीही उपयोग राहणार नाही. शिवाय त्यामुळे येणाऱ्या आर्थिक ताणामुळे आपल्यावर मोठं कर्ज होईल”, असं कार्ती चिदम्बरम यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भारतात ऑलिम्पिक भरवण्यापेक्षा आपण आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण, प्रवास आणि स्पर्धा करण्यासाठी शक्य ती सर्व मदत आणि संसाधनं पुरवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. त्याची सुरुवात भारतातून भविष्यातील पदकविजेते घडवण्यापासून करायला हवी”, असा सल्ला चिदम्बरम यांनी दिला आहे.

मनु भाकेरचं विक्रमी पदक!

भारताच्या मनु भाकेरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकप्रवासाला दमदार सुरुवात केली आहे. या कामगिरीमुळे मनु भाकेर ही नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. त्याशिवाय याआधी या प्रकारात फक्त चार भारतीयांन पदक मिळालं आहे.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी