व्यापार आणि उद्योगातील योगदानासाठी पिचई यांना या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो”, अशी प्रतिक्रिया यावेळी पिचई यांनी दिली.
यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी १७ दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती. “मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशाने मला घडवलं, त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे”, असं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ५० वर्षीय पिचई म्हणाले. “शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं, यासाठी आई-वडिलांनी मोठा त्याग केला”, अशी भावना पिचई यांनी यावेळी व्यक्त केली.
“गुगल आणि भारत यांच्यातील महान भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं यावेळी पिचई यांनी सांगितलं. सॅन फ्रान्सिस्कोतील या पुरस्कार सोहळ्यात भारताचे वाणिज्यदूत टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासह पिचई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पिचई यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून अमर्यादीत शक्यता निर्माण केल्याचं सांगत संधू यांनी त्यांचा गौरव केला. “जगाच्या विविध भागांमध्ये डिजिटल साधने आणि कौशल्ये समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत”, असं यावेळी संधू म्हणाले. गुगलने यावर्षी मशीन लर्निंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाषांतर सेवेमध्ये आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतातील आठ भाषांचा समावेश आहे.