Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले ; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ कायम

मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचले

देशभरात इंधन दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२१ पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ३० डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे.

आज पेट्रोल दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीमुळे देशभरातील मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर १००.२१ रुपये प्रति लिटर झाला आहे आणि डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटर विक्री होत आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलच्या दरात ८५ पैशांची आणि डिझेलच्या दरात ७५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोल ११५.०४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९९.२५ रुपये लिटर झाले आहे.ht

इंधर दरवाढ का?

भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आयात करतो. करोनाच्या काळात किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?