PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

PM Modi calls US President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केला. या दौऱ्यातील माहिती त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिली. तसेच भारत शांततेसाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले.

PM Modi calls US President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी युक्रेनचा दौरा केला होता. या दौऱ्यातील माहिती आणि बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आम्ही युक्रेनची स्थिती आणि त्याचबरोबर विविध क्षेत्र आणि वैश्विक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताचा पाठिंबा असेल, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. तसेच आम्ही बांगलादेशमधील परिस्थितीवरही चर्चा केली. बांगलादेशमधील परिस्थिती लवकर सामान्य होऊन तेथील अल्पसंख्याक आणि विशेष करून हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे, यावर जोर दिला.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केला होता. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान ‘मारिन्स्की पॅलेस येथे अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली. भारत शांततेच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी झेलेन्स्की यांना दिले होते. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी रशिया आणि युक्रेनचे दौरे केले आहेत.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचार

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन सत्तांतरापर्यंत पोहोचले. ज्यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून लष्कराच्या पाठिंब्यावर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार काम करत आहे. मात्र बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हिंदू अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबद्दल भारतात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!