Prophet Row: अजित डोवाल यांच्यासंदर्भात केलेला दावा इराणने घेतला मागे; नेमकं काय घडलं?

प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना धडा शिकवणार, अजित डोवाल यांनी आश्वासन दिल्याचा इराणचा होता दावा

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वाद सुरु असतानाच इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन भारत दौऱ्यावर आहेत. अब्दुल्लाहियन यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अजित डोवाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचं आश्वासन दिल्याचा दावा केला होता. पण आता मात्र इराणने हा दावा मागे घेतला आहे.

अब्दुल्लाहियन हे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बुधवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अब्दुल्लाहियन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. अब्दुल्लाहियन यांनी काही भारतीय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. या भेटीत अजित डोवाल यांचाही समावेश होता.

हे वाचले का?  Khalida Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!

भेटीनंतर इराणने प्रसारमाध्यमांसाठी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून संबंधित चर्चेची माहिती दिली होती. त्यानुसार अब्दुल्लाहियन यांनी अजित डोवाल यांच्याकडेही वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित डोवाल यांनी दोषींना अशी शिक्षा केली जाईल की इतरांनाही धडा मिळेल असं आश्वासन दिल्याचं इराणने म्हटलं होतं. मात्र आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बेबसाईटवरुन हा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर इराणसह इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, इराण, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहारिन, मालदिव, लिबया आणि इंडोनेशिया देशांनी १५ देशांनी निषेध नोंदवला असताना या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

“द्विपक्षीय धोरणात्मक संबंध वाढवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर आणि इतर भारतीय अधिकाऱ्यांची भेट झाली. तेहरान आणि दिल्ली एकमेकांच्या धर्माचा आदर तसंच इस्लामचं पावित्र्य राखण्यावर आणि द्वेष पसरवणारी वक्तव्यं न करण्यावर सहमत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध अजून दृढ करण्याचा आमचा निर्धार आहे,” असं ट्वीट अब्दुल्लाहियन यांनी बुधवारी रात्री केलं होतं.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एस जयशंकर यांच्यासोबत झालेल्या भेटीत प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भातील विधानाचा मुद्दा चर्चेत आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “हे भारत सरकारचं मत नसल्याचं आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. संबंधित टिप्पणी तसंच ट्वीट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आमच्याकडे या विषयावर अतिरिक्त सांगण्यासारखं काही नाही,” असं त्यांनी म्हटलं.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?