Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय

Ranji Trophy 2024: अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी विजय मिळवला.

रणजी करंडक स्पर्धेची तब्बल ४१ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईने सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूला एक डाव आणि ७० धावांनी नमवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत त्यांच्यासमोर विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्याचं आव्हान असणार आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईने विक्रमी ४८व्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आगेकूच केली आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेची अंतिम लढत १० ते १४ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

एमसीए-बीकेसी मैदानावर झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र गोलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर मुंबईच्या गोलंदाजांना तामिळनाडूच्या डावाला खिंडार पाडलं. विजय शंकर (४४) आणि वॉशिंग्टन सुंदर (४३) यांचा अपवाद वगळता तामिळनाडूच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यांचा डाव १४६ धावांतच आटोपला. मुंबईकडून तुषार देशपांडेने ३ तर शार्दूल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियनन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईची अवस्था १०६/७ अशी झाली. पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर हे सगळे प्रमुख खेळाडू झटपट तंबूत परतले. साई किशोरच्या फिरकीसमोर मुंबईची अवस्था बिकट झाली होती. मात्र यानंतर शार्दूल ठाकूर आणि हार्दिक तामोरे यांनी आठव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ३५ धावा करुन बाद झाला. शार्दूलला तनुष कोटियनची साथ मिळाली. या जोडीने नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने आव्हानात्मक खेळपट्टीवर तडाखेबंद फलंदाजी करत कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. शार्दूलने १०९ धावांची खेळी केली. त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांसह ही खेळी सजवली. शार्दूल बाद झाल्यानंतर तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी शेवटच्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. मुंबईने ३७८ धावांची मजल मारली. तामिळनाडूतर्फे साई किशोरने ६ विकेट्स पटकावल्या. मुंबईला २३२ धावांची आघाडी मिळाली.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

दुसऱ्या डावातही तामिळनाडूच्या फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. बाबा इंद्रजीतने ९ चौकारांसह ७० धावांची एकाकी झुंज दिली. तामिळनाडूचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. मुंबईतर्फे शम्स मुलानीने ४ तर शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, तनुष कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. शतकासह चार विकेट्स पटकावणाऱ्या शार्दूल ठाकूरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना