Ranji Trophy Final 2024: रणजी ट्रॉफी मुंबईचीच! विदर्भला नमवत रहाणेच्या शिलेदारांनी ८ वर्षांनी पटकावले जेतेपद

anji Trophy Mumbai vs Vidarbha Final: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवला आहे आणि ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले.

Mumbai Beats Vidarbha in Ranji Trophy Final 2024: मुंबईच्या संघाने विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. विदर्भच्या संघानेही कडवा प्रतिकार करत मुंबईला सहज विजय मिळवू दिला नाही. अक्षय वाडकर, करूण नायर आणि हर्ष दुबे यांनी मुंबईने दिलेले डोंगराएवढे लक्ष्य गाठण्याचा आठोकाठ प्रयत्न केला खरा पण मुंबईच्या शिलेदारांनीही काही शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि रणजी करंडकावर आपले नाव कोरले. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत १०वी विकेट घेतली आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ ठरला.

पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा डाव सुरू झाला तेव्हा विदर्भचा संघ ५ बाद २४८ धावांवर खेळत होता. त्यांना विजयासाठी २९० धावांची तर मुंबईला ५ विकेट्सची गरज होती. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. वाडकरने रणजी फायनलमधील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले होते.पण नंतर ९ चौकार आणि १ षटकार लगावत १०२ धावा करणाऱ्या शतकवीराला मुंबईच्या तनुष कोटीयनने शतकी खेळी केलेल्या अक्षय वाडकरला पायचीत करत विदर्भ संघाला मोठा धक्का दिला.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

तनुषनंतर तुषार देशपांडेने दुबेला झेलबाद करत विदर्भाच्या आशांवर पाणी फेरले.त्यानंतर आदित्य सरवटेची विकेटही देशपांडेच्या नावे होती. तनुष कोटीयनने षटकार लगावणाऱ्या यश ठाकूरला क्लीन बोल्ड केले. नंतर अजिंक्यने शेवटच्या विकेटची जबाबदारी अनुभवी धवलवर सोपवली आणि त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने उमेश यादवला क्लीन बोल्ड करत सामना मुंबईच्या नावे केला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भ संघाचा डाव १०५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईच्या मुशीर खानच्या शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या ९५ धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ७३ धावांच्या जोरावर सर्वबाद ४१८ धावांचा डोंगर उभारला आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

प्रत्युत्तरात विदर्भकडून सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरी यांनी त्यांना ६४ धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला पण शम्स मुलाणीने तायडेला बाद करून पहिली विकेट मिळवली. तनुष कोटियनने शोरीला बाद करत लगेचच दुसरी विकेट घेतली. अमन मोखाडे आणि यश राठोडला पायचीत करत त्यांना झटपट माघारी धाडले आणि पाहुण्या संघाने १३३ धावांवर ४ विकेट गमावले होते. करूण नायर चांगल्याच फॉर्मात दिसत होता, विस्फोटक खेळी करत त्याने ७४ धावा केल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस गोलंदाजीला आलेल्या मुशीर खानने नायरला झेलबाद केले.

मुंबईने शेवटचं रणजी जेतेपद (२०१५-१६) मध्ये पटकावलं होतं. त्या सामन्यातील ३ खेळाडू या सामन्यातही आहेत. श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी. या तिन्ही खेळाडूंनी अंतिम सामन्यात मोठी भूमिका बजावली. ८ वर्षांपूर्वीच्या त्या फायनल सामन्यात श्रेयसने शतक केलं होतं आणि या अंतिम सामन्यातही श्रेयसने ९५ धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूरने सामन्याच्या पहिल्या डावात संघ बॅकफूटवर असताना ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाची धावसंख्या २०० पार नेली. अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीने अंतिम सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या. मुंबईने सांघिक प्रदर्शनाच्या बळावर जेतेपद पटकावलं आहे. या हंगामात कर्णधाराची कामगिरी सर्वसाधारण राहिली पण रहाणेने अंतिम सामन्यत ७४ धावांची खेळी केली.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

मुंबई संघाचा स्टार खेळाडू तनुष कोटीयन याला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित केले आहे.तर युवा खेळाडू मुशीर खान याला अंतिम सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले.