Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ravikant Tupkar : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीसंदर्भात रनणीती आखण्याचं काम नेत्यांकडून सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. “कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागण्यांसाठी आम्ही एक राज्यव्यापी आंदोलन उभं करणार आहोत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन न भूतो न भविष्यति असं असेल. मग या राज्यातील सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, असा इशारा रविकांत तुपकरांनी माध्यमांशी बोलताना दिला.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

रविकांत तुपकर काय म्हणाले?

“मुंबईच्या आंदोलनामध्ये आमची मागणी होती की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या, सोयाबीन आणि कापसाचे दोन ते तीन वर्षांपासून दर पडलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या दर वाढीच्या अनुषंगाने केंद्र सरकारशी चर्चा करून आयात आणि निर्यातीबाबत धोरण ठरवावं, अशी आमची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मला अटक केली. त्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं”, असा आरोप रविकांत तुपकरांनी सरकारवर केला.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

चार दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा…

“राज्य सरकारला आमचं एकच सांगणं आहे की, दोन ते चार दिवसांत आमच्या मागण्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा येणाऱ्या काळात कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीसह आदी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन उभं करणार आहोत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन न भूतो न भविष्यति असं असेल. तसेच या राज्यातील सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल. अशा पद्धतीचं आंदोलन असेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की, पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या. आपण जातीसाठी एकत्र येतो तर मग मातीसाठी देखील एकत्र आलं पाहिजे”, असंही रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल