रिझर्व्ह बँकेकडून पाव टक्क्याची व्याजदर कपात

रिझर्व्ह बँकेकडून पाव टक्क्याची व्याजदर कपात
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

सहा महिने यथास्थिती ठेवल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्क्यांच्या कपातीचा दिलासादायी निर्णय घेतला. यातून बँकांची कर्जे आणखी स्वस्त होणार असून, घर खरेदी, मोटार खरेदीच्या तयारीत असलेल्यांना ही आनंदाची बातमी ठरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी आशादायी अंदाज व्यक्त करतानाच, घसरत्या रुपयासंबंधी चिंतेला दूर करणारेही आश्वासक विधान रिझर्व्ह बँक गव्हर्नरांनी यानिमित्ताने केले.

बुधवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती सहा सदस्य असलेल्या पतधोरण निर्धारण समितीने (एमपीसी) बँकांच्या कर्जाच्या व्याजदराला प्रभावित करणारा रेपो दर पाव टक्क्यांनी कमी करून ५.२५ टक्क्यांपर्यंत आणण्याचा निर्णय एकमताने घेतला.

शिवाय मध्यवर्ती बँकेने तिच्या धोरणदिशेत ‘तटस्थ’तेची भूमिका कायम ठेवल्याने यापुढेही दरकपातीला वाव असल्याचे संकेत दिले. विकासाच्या बाजूने कौल देणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे बांधकाम विकसक, वाहन कंपन्या आणि उद्याोग क्षेत्रानेही सहर्ष स्वागत केले. भांडवली बाजारातही पडझडीला खंड पाडला आणि सेन्सेक्सने शुक्रवारच्या सत्रात ४४७ अंशांची स्वागतपर तेजी दाखविली.

पहिल्या सहामाहीत चलनवाढ अवघी २.२ टक्के आणि अर्थव्यवस्था वाढीचा दर दमदार ८ टक्के राहणे असा दुर्मीळ सुवर्णमध्याचा काळ आपण अनुभवला. बाह्य वातावरण प्रतिकूल आणि आव्हानात्मक असताना भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या सुवर्णकाळासाठी ताज्या कपातीतून पाठबळ दिले जाणे आवश्यकच होते. – संजय मल्होत्रा, रिझर्व्ह बँक गव्हर्नर