RTE Admission 2024 : रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
नाशिक – RTE Admission 2024 सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीत जिल्ह्यात चार हजार ८०७ जणांची निवड झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत यातील केवळ एक हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून तीन हजार ७६७ जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत प्रयत्न होत आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी आभासी पध्दतीने सोडत अलीकडेच काढण्यात आली. इंग्रजी, मराठी हिंदी, गुजराती, उर्दू अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येतो. यंदा नियोजित वेळेप्रमाणे वेळापत्रक जाहीर झाले. पालकांकडून अर्ज भरण्यास सुरूवातही झाली. परंतु, या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आल्याने प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकली.
राज्यात ९२१७ शाळांमध्ये एक लाख पाच हजार २२३ जागा उपलब्ध असून यासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले. नाशिक जिल्ह्यात ४२८ शाळा सर्वांना शिक्षण हक्क प्रक्रियेत सहभागी असून पाच हजार २७१ जागा यासाठी उपलब्ध आहेत. एकूण १४ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले. पहिल्या सोडतीनंतर रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत साधारणत: जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. यंदा ही प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामुळे लांबली. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. बहुतांश शाळांमध्ये पहिल्या चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले असताना प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळा अभ्यास सरावाविना थेट परीक्षेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.