Rupee fall : रुपयाच्या गटांगळ्या सुरूच; ऐतिहासिक नीचांकाच्या दिशेनं वाटचाल, ४० पैशांनी झाली घसरण!

Rupee against dollar : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन सुरुच असून आज रुपयानं अजून एक नीचांकाची नोंद केली आहे.

Rupee fall to all time low : गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकाही केली जात आहे. आर्थिक अडचणींचा परिणाम शेअर बाजारातही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रुपया दिवसेंदिवस अधिकच घसरत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला असून दररोज नवनवे नीचांक गाठताना दिसत आहे. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री रुपया इतर चलनांच्या तुलनेत कमी घसरल्याचा दावा करत असताना दुसरीकडे दररोज होणारी घसरण गुंतवणूकदार आणि आर्थिक विश्लेषकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

४० पैशांची घसरण

बुधवारी रुपयानं तब्बल ४० पैशांची घसरण नोंदवली. त्यामुळे आत्तापर्यंतचा सर्वात नीचांकी दर रुपयानं आज गाठला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज सकाळी रुपयाचं मूल्य तब्बल ८१.९३ इतकं नोंदवलं गेलं. त्यामुळे प्रतीडॉलर ८२ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकाच्या दिशेनं रुपयाची वाटचाल सुरू असल्याचं या आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि पर्यायाने शेअर बाजारात चिंता पसरली आहे.

डॉलर वधारल्यामुळे सर्वच चलनांवर संकट!

दरम्यान, डॉलरचा दर दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत असल्यामुळे जवळपास सर्वच देशातील चलनांसमोर संकट उभं ठाकलं आहे. यासंदर्भात डॉलरचं काही प्रमाणा अवमूल्यन घडवून आणण्यासाठी अमेरिका चलन करार करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, असा कोणताही विचार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचं अवमूल्यन अधिकच वेगाने होऊ लागलं आहे.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८१.५७ पैशांवर होता. मात्र, बुधवारी जवळपास ४० पैशांची घसरण होऊन थेट ८१.९३ वर पोहोचला. दरम्यान, मंगळवारी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी इतर देशांच्या चलनांशी रुपयाची तुलना करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.

हे वाचले का?  अलिबागच्या नाट्यगृहासाठी ९ कोटी ३२ लाखांचा निधी