SAFF Championship: विजयानंतर जॅक्सन सिंगने फडकावला मणिपूरचा झेंडा; म्हणाला, “’मला आशा आहे की आता तिथे…”

India Midfielder Jeakson Singh: भारताने विजयाचा आनंद साजरा केला आणि पदक मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना टीम इंडियाच्या जॅक्सनने त्याच्या जर्सीवर बहुरंगी ध्वज लावला. त्याच्या या ध्वजने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

India Midfielder Jeakson Singh: टीम इंडियाने सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. बंगळुरूच्या ‘श्री कांतीरावा’ स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव केला. पूर्णवेळ आणि नंतर अतिरिक्त वेळेपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. यानंतर गुरप्रीत सिंगच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे टीम इंडियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. सामन्यानंतर एक ट्वीट व्हायरल झाले, ज्यामध्ये असे लिहिले होते, “जॅक्सन सिंग, महेश सिंग आणि उदांता सिंग, हे तिघेही सॅफ चॅम्पियनशिप २०२३ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते आणि ते मणिपूरचे आहेत. तेच मणिपूर, जे गेल्या दोन महिन्यांपासून धगधगत आहे. त्यामुळे विजय साजरा करताना मणिपूरची आठवण करा.”

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

हे तिन्ही खेळाडू भारतीय राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांनी ब्लू टायगर्सला सॅफ कप आणि त्यानंतर इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने विजयाचा आनंद साजरा केला आणि पदक मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना, वरील तीन खेळाडूंपैकी जॅक्सनने त्याच्या जर्सीवर बहुरंगी ध्वज लावला. त्याचा हा लपेटलेला ध्वज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. जॅक्सनने पुष्टी केल्याप्रमाणे, तो मणिपूरचा ध्वज होता, जो त्याने एकतेचा संदेश देण्यासाठी स्वतःभोवती पांघरला होता. जॅक्सन म्हणाला की, “त्याला आपल्या राज्यात शांतता हवी आहे.”

मात्र, जॅक्सनने सोशल मीडियावर होत असलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देत कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट केले. त्यानी हा विजय सर्व भारतीयांना समर्पित केला. जॅक्सनने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय चाहत्यांनो, मला मणिपूरचा ध्वज फडकावून कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. माझे गृहराज्य मणिपूर सध्या ज्या समस्यांना तोंड देत आहे त्याकडे लक्ष वेधण्याचा माझा हेतू होता. टीम इंडियाचा हा विजय सर्व भारतीयांना समर्पित आहे. मला आशा आहे की माझ्या राज्य मणिपूरमध्ये शांतता परत येईल. संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर आल्याबद्दल चाहत्यांचे आभार!” जॅक्सनने “भारत” आणि ” सॅफ चॅम्पियनशिप २०२३” व्यतिरिक्त “सेव्ह मणिपूर” आणि “पीस अँड लव्ह” हॅशटॅगसह ट्वीट केले.

हे वाचले का?  समुद्रातून डिझेल तस्करी करणारी टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनीही मणिपूर प्रकरणावर भाष्य केले होते. इंटरकॉन्टिनेंटल चषकापूर्वी ते म्हणाले, “तुम्ही आणि तुमचे कुटुंब कुठे राहता याविषयी त्रासदायक बातम्या वाचत किंवा ऐकत असताना फुटबॉलवर लक्ष केंद्रित करणे सोपे नसते. पण हे खेळाडू (उदांता, जॅक्सन, महेश) भारतासाठी विलक्षण कामगिरी करत आहेत.” मणिपूर दोन महिन्यांहून अधिक काळ धुमसत आहे, ज्यामध्ये १२० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे हजारो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. मेतैई समुदाय आणि कुकी यांच्यात ३ मे रोजी वांशिक हिंसाचार झाल्यापासून तणाव वाढला आहे.