खासदार संजय राऊत यांनी सांगितला महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष आणि इतर छोटे पक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जिंकेल त्याला उमेदवारी हे आमचं सूत्र आहे. समाजवादी पक्ष कुठे जिंकतोय तर त्यांना जागा दिली जाईल. जागावाटपाचं आमचं सूत्र हेच आहे. २०० जागा लढवणार, १०० जागा लढवणार असं काहीही आमच्यात चाललेलं नाही. शिवसेनेला किती जागा? वगैरे प्रश्न नाही. तिन्ही पक्ष आणि पक्षप्रमुख हे संख्येवर बोलतच नाही. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा
प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा होते आहे. प्रत्येक मतदारसंघाचे पैलू वेगळे असतात. आमची चर्चा मतदारसंघांप्रमाणे होते आहे. आम्ही संख्येचा विचार करत नाही त्यावर गेलो असतो की तुम्ही १०० लढा, तुम्ही ८० लढा हे असं करायचं असतं तर हा तासाभराचा खेळ असतो. आम्हाला भाजपाचा आणि गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक गटाचा पराभव करायचा आहे. दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल.
अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर टीका
आमच्याकडे काही कुणी दिल्लीतून येणार नाही. जसं आता देशातले गृहमंत्रीच येऊन बसलेत, पंतप्रधान येणार आहेत. मेट्रोच्या उद्घाटन निमित्ताने येणार आहेत, पण ठाण्यात जाणार आहेत. पाचपाखाडीला जाणार, वाघबीळला जातील, भांडुप गाव, कांजूर गावातही जातील, पंतप्रधान अशासाठी येतात का? असा खोचक प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला. त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल हे जागावाटपासाठी येऊन बसायचे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. सरदार पटेलांनी देशाचा विचार केला, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वॉर्डा वॉर्डांत जाऊन प्रचार करत नव्हते. एकच सभा घ्यायचे ते पुरेसं असायचं. आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री प्रचारासाठी गल्लीबोळांत फिरत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
गुजराती व्होट जिहाद म्हणणार का भाजपा?
२६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घ्यावीच लागेल. निवडणूक लांबणीवर वगैरे काहीही जाणार नाही. व्होट जिहादच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण व्होट जिहाद काय असतो मला सांगा. या देशात देशाचे नागरिक मग तो मुस्लिम असो, जैन, पारशी असो किंवा हिंदू असो तो मतदान करतो. तो मतदार तुम्हाला मतदान करतो ते चालतं का? जर व्होट जिहाद आहे तर मग मुस्लिम महिलांसाठी ट्रिपल तलाकचा कायदा का आणला? इतर समाजाचे लोक तुम्हाला मतं देतात. महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपाला मतदान करतात मग त्याला काय म्हणायचं? गुजराती लोकांचं व्होट जिहाद म्हणणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.