Sanjay Raut : “मी पुन्हा सांगतो मोठी गडबड…”, विधानसभेच्या निकालाबाबत संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “हा कौल कसा…”

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात काय होणार? कोणाचं सरकार येणार? महायुतीला किती जागा मिळणार? महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? यासंदर्भातील चित्र पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत समोर आल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे जास्त जागा कोणाला मिळतात? हे थोड्या वेळात स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात काय होणार? कोणाचं सरकार येणार? महायुतीला किती जागा मिळणार? महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? यासंदर्भातील चित्र पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालाबाबत आणि मतमोजणीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. ‘हा कौल कसा मानावा? काहीतरी मोठी गडबड आहे. निकाल लावून घेतले आहेत. कुछ तो गडबड है. हा कौल कसा मानावा? माझ्या सारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसांचा विश्वास नाही’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

हे वाचले का?  Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. कुछ तो गडबड है, एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कोणत्या भरोशावर मिळतात? अजित पवारांना ४० पेक्षा जास्त जागा कोणत्या भरोशावर मिळतात? मग देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे कोणते दिवे महाराष्ट्रात लावले की त्यांना २० पेक्षा जास्त जागा मिळतात? महाराष्ट्रातील वातावरण आणि राज्यातील जनता कल ज्या पद्धतीने होता, राज्यभर आम्ही फिरलो, आम्हाला जनतेचा कल माहिती आहे. हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी पंरपरा आहे ती आम्ही पाळली. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो. पण हा कौल कसा मानावा? हा प्रश्न या राज्यातील जनतेला पडलेला आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

“शरद पवारांनी राज्यात तुफान उभा केलं होतं. तुम्ही त्याला १० जागाही द्यायला तयार नाहीत? असं या महाराष्ट्रात शक्य नाही. ही काय गडबड आहे हे सर्वांना कळेल. हा निकाल जरी येत असला तरी हा जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही. हा जनतेचा कौल नव्हता. जय पराजय होत असतात. निवडणुकीत जय परायज होत असते. त्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. निकाल लावून घेतलेले आहेत. त्यामुळे त्या निकालाबाबत माझ्या सारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसांचा विश्वास नाही”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.

“लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला झाला असं मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके अजोबा, लाडके मामा, लाडके दादा नाहीत का? आहेत ना? मी पुन्हा सांगतो काहीतरी मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर गौतम अदानींचं बारीक लक्ष होतं. काल अदानींचं अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील, याबाबत आमच्या मनात शंका होती”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.