Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

भरत गोगावले म्हणाले, “साहेबांनी आम्हाला विचारलं की काय करायचं? एकजण म्हणाला मी बारामतीचा राजीनामा देतो. त्याला…”

Sanjay Shirsat CIDCO Chairman: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अर्थात शिंदे गटामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राज्यात शिंदे गट सत्तेत आल्यापासून भरत गोगावले हे मंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यांनी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलूनही दाखवली आहे. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी मंत्रीपदानं हुलकावणी दिल्यानंतर आता त्यांनी त्यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

भरत गोगावले यांना नुकतंच पक्षानं एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देऊ केलं आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील दुसरे आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. यानंतर संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात त्यांचं जंगी स्वागतदेखील करण्यात आलं. मात्र, हा मुद्दा धरून भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमातील भाषणादरम्यान संजय शिरसाट यांचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केलं आहे. भरत गोगावले यांनी भाषणात सिडकोच्या अध्यक्षपदाचा उल्लेख केल्यामुळे त्यांचा रोख संजय शिरसाट यांच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

काय म्हणाले भरत गोगावले?

भरत गोगावलेंनी या कार्यक्रमात बोलताना मंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. “साहेबांनी आम्हाला विचारलं की शेठ काय करायचं? एकजण म्हणाला मी बारामतीचा राजीनामा देतो. त्याला समजवलं. तू मंत्रीपदाची शपथ घेतली की मी बारामतीचा राजीनामा देतो असं म्हणाला. म्हणूनच कदाचित साहेबांनी त्याला सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. लक्षात ठेवा”, असा उल्लेख भरत गोगावले यांनी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हे वाचले का?  ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

“नंतर ते बोलले काय करू शेठ? जर मला मंत्रीपद नाही मिळालं तर माझी बायको आत्महत्या करेल. मग आमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं?” असा खोचक सवालही भरत गोगावले यांनी केला.

“आम्हाला मुख्यमंत्री अडचणीत सापडल्याचं दिसलं. आम्ही विचारलं काय झालं? तर ते म्हणाले, एक म्हणतो बायको आत्महत्या करेल, एक म्हणतो मला नारायण राणे संपवेल. मी म्हटलं त्यांना देऊन टाका. मी थांबतो”, असं भरत गोगावलेंनी वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये एका कार्यक्रमात म्हटलं होतं. तेव्हाही त्यावरून बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आदिती तटकरेंच्या मंत्रि‍पदात ढवळाढवळ?

दरम्यान, आदिती तटकरेंच्या उपस्थितीत भरत गोगावले यांनी पक्षाकडून त्यांच्या मंत्रीपदाच्या कामामध्ये ढवळाढवळ न करण्यास सांगितल्याचं सूचक विधान केलं आहे. “एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मला दिलं. त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. मंत्र्यांकडे पूर्वी हे अधिकार असायचे. परवा त्याचा जीआर काढून त्यासंदर्भात आदेशही पारीत केले आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की जे काही आलं असेल ते घ्यावं. (आदिती तटकरे) ताईंच्या मंत्रिमंपदामध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टी करू नका. म्हटलं आता काही करत नाहीये. काही करण्याचं कारण नाहीये”, असं भरत गोगावले म्हणाले.

हे वाचले का?  Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?