Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चांबाबत मोठं भाष्य केलं.

Sharad Pawar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष राज्यभर मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

अशातच काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीचा षण्मुखानंद सभागृहात एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका मांडली होती. आता याबाबत बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चांबाबत मोठं भाष्य केलं. “आमच्याकडून (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) कोणालाही मुख्यमंत्रि‍पदामध्ये रस नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही”, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार काय म्हणाले?

“मी माझ्या पक्षापुरतं सीमित सांगू इच्छितो की, आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रि‍पदाबाबत रस नाही. आम्हाला कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे.महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन करून एका विचाराने राज्यातील जनतेला उत्तम प्रशासन द्यायचं हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कोण असावं आणि कोण नसावं? हा प्रश्न नाही. आम्ही कोणीही असणार नाही. तसेच माझा तर प्रश्नच नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठींबा देतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

नाना पटोले काय म्हणाले?

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा सुरु आहेत. त्यामुळे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत आली तर आमच्या पक्षाचे हायकमांड जे काही ठरवतील त्या प्रमाणे मुख्यमंत्री होणार. त्यामुळे हा विषय आता नाही. महाराष्ट्रातील विविध प्रश्न महत्वाचे आहेत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल