Social Media Ban for Kids Australia : सोशल मीडियावर रमणाऱ्या लहान मुलांच्या पालकांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सरकार याविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहे.
Social Media Ban for Kids Australia : लहान मुलं मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय होत असल्याने त्यांचं बालपण हिरावून घेतलं जात आहे. सोशल मीडियामुळे त्यांचा स्क्रिनिंग टाईम वाढतो. परिणामी त्यांच्या बौद्धिक विकासात अडचणी निर्माण होतात. यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पालकांची मागणी, विरोधकांचं आश्वासन अन् सत्ताधाऱ्यांचा निर्णय
फेसबूक, इन्स्टाग्राम आणि टीकटॉकसारख्या सोशल मिडिया खात्यावर वापरकर्त्यांचं किमान वय ठरवण्यात आलेलं नाही. परंतु, १४ ते १६ वर्षांवरील वापरकर्ते याचा वापर करू शकत असतील. दरम्यान, पालकांनी मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेची मागणी केल्याने विरोधकांनी सोशल मिडिया बॅनबाबत आश्वासन दिलं. त्यामुळे यासंदर्भात कायदे केले जातील असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात पुढील मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.
“पालक मला सांगतात की सोशल मीडियावर किती वयाच्या मुलांनी असावं याबाबत काळजी वाटते. सोशल मिडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी किमान वय लागू करण्याकरता आम्ही संसदेच्या टर्ममध्ये कायदा आणू. पालकांना समर्थन देऊन मुलांना सुरक्षित ठेवण्याबाबत हा निर्णय आहे”, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थोनी अल्बानिस यांनी सांगितलं.
“मला माहितेय की सोशल मीडियाचा लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतो. याबाबत पालक आणि मी चिंतेत आहोत. म्हणूनच आम्ही सोशल मीडियासाठी किमान वयाचा कायदा आणू. मुलांना बालपण असावं, असं मला वाटतं. त्यांनी मोबाईल सोडून टेनिस कोर्टवर खेळायला हवं”, असं अन्थोनी अल्बानिस यांनी व्हिडिओद्वारे सांगितलं.
अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑस्ट्रेलियाचे पुराणमतवादी विरोधी पक्षनेते पीटर डटन म्हणाले, लहान मुलं सोशल मीडियाचा वापर करत असल्याने त्यांना सर्वाधिक धोका संभोवतो. वय मर्यादा लागू करण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येते.