१९ जून ते ५ जुलै या कालावधीत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये आठ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले होते
विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर दिल्लीतून नाशिकच्या दिशेने उड्डाण घेतलेले स्पाईस जेटचे विमान पुन्हा दिल्लीला परतले. स्पाईस जेटच्या (SG-8363) या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, अर्ध्या रस्त्यातच हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर वळवण्यात आले, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
“१ सप्टेंबरला स्पाईस जेटच्या (SG-8363) या विमानाचा दिल्ली ते नाशिक प्रवास नियोजित होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच या विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या परवानगीनंतर दिल्ली विमानतळावर या विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले”, अशी माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये स्पाईस जेटच्या विमानांमध्ये झालेल्या बिघाडांच्या मालिकेतील या महिन्यातली ही पहिलीच घटना आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) निर्देशांनुसार स्पाईसजेट विमान कंपनीकडून केवळ अर्ध्या क्षमतेनुसार म्हणजेच ५० टक्क्यांपर्यंत विमानांचं उड्डाण केलं जात आहे. १९ जून ते ५ जुलै या कालावधीत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये आठ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या विमान कंपनींवर डीजीसीएने आठ आठवड्यांसाठी निर्बंध लावले होते.