Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

Student Suicides Report: भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्या असून लोकसंख्येची वाढ आणि शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीलाही आता विद्यार्थ्यांच्या संख्येने मागे टाकल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Student Suicides Report: देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या आत्महत्या लोकसंख्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येपेक्षाही अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यातही महाराष्ट्र या नको असलेल्या संख्येत सर्वाच वरच्या स्थानी आहे. “विद्यार्थी आत्महत्या: भारतात वेगाने पसरणारी महामारी” (Student Suicides: An Epidemic Sweeping India) या शीर्षकाचा अहवाल बुधवारी वार्षिक आयसी३ परिषद आणि एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) च्या आकडेवारीवर आधारित या अहवालात नमूद केले आहे की, भारतात एकूण आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी वाढला आहे. तसेच बऱ्याच घटनांची नोंद होत नसल्यामुळे प्रत्यक्ष आत्महत्येची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, असेही या अहवालात म्हटले गेले आहे. आयसी३ संस्था ही एक बिगर सरकारी संस्था असून जगभरातील शालेय शिक्षण संस्थांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, समुपदेशक आणि प्रशासकांना मार्गदर्शन करण्याचेही काम संस्थेकडून केले जाते.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी

अहवालात २०२२ च्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. २०२१ च्या तुलनेत (१३,०८९) २०२२ साली १३,०४४ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत अतिशय किंचितसा फरक आहे. एकूण आत्महत्येची आकडेवारी (विद्यार्थी आणि इतर घटक) यापेक्षा भयानक आहे. २०२१ साली १ लाख ६४ हजार ०३३ आत्महत्या झाल्या होत्या. तर २०२२ साली १ लाख ७० हजार ९२४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. २०२१ च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागच्या दोन दशकांची तुलना केल्यास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र आघाडीवर

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर तमिळनाडू आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र – १,७६४ आत्महत्या (१४ टक्के)

तमिळनाडू – १,४१६ आत्महत्या (११ टक्के)

मध्य प्रदेश – १,३४० आत्महत्या (१० टक्के)

उत्तर प्रदेश – १,०६० आत्महत्या (८ टक्के)

झारखंड – ८२४ आत्महत्या (६ टक्के )

वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या तीनही राज्यात देशातील एक तृतीयांश आत्महत्या होत आहेत. विशेष म्हणजे राजस्थानमधील कोटा शहरात ५७१ आत्महत्यांची नोंद झाली असून ते दहाव्या क्रमाकांवर आहे. कोटा शहरात अनेक क्लासेस आहेत. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करण्यासाठी येत असतात.

मागच्या काही वर्षातील आत्महत्येचे आकडे हे लोकसंख्या वाढीच्या संख्येलाही मागे टाकत आहेत. मागच्या दशकात ०-२४ या वयोमानादरम्यानची लोकसंख्या ५८२ दशलक्षावरून घसरून ५८१ दशलक्षावर आली आहे. तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६,६५४ वरून १३,०४४ वर पोहोचल्या आहेत.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या

लिंगावर आधारित आकडेवारी पाहिल्यास, मागच्या दशकात मुलांच्या आत्महत्येत ५० टक्क्यांची वाढ झाली असून मुलींच्या आत्महत्यांमध्ये ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या पाच वर्षांत विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या आत्महत्येमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.