१६ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता स्थानिकांनी तालिबान्यांविरोधात एकत्र येण्यास सुरुवात केलीय.
अफगाणिस्तानमध्ये अनेक नागरिकांनी आता तालिबानविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केलीय. नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वाखालील फौजांना स्थानिकांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केलीय. अंदाराब येथे तालिबान आणि नॉर्दन अलायन्सदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये तालिबानचे ३०० दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
तालिबानने मागील सोमवारी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर आता स्थानिकांनी तालिबान्यांविरोधात एकत्र येण्यास सुरुवात केलीय. नॉर्दन अलायन्सने तालिबान्यांविरोधात सुरु केलेल्या लढाईमध्ये स्थानिकांनीही सहभाग घेण्यास सुरुवात केलीय. १७ ऑगस्ट रोजीच अमरुल्लाह सालेह यांनी “मी देशाचा काळजीवाहू अध्यक्ष आहे”, असं जाहीर केलं होतं. त्यांनी थेट तालिबानलाच आव्हान दिलं आहे. सध्या सालेह आणि त्यांची फौज पंजशीरचं खोरं आणि कापीसामधून तालिबान्यांविरोधात लढत आहे.
रिपब्लिक टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सध्या पंजशीर आणि कापीसामध्ये तालिबानी आणि नॉर्दन अलायन्सच्या फौजांमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून दोन्ही बाजूने तुफान गोळीबार केला जात आहे. अंदाराब या ठिकाणी झालेल्या संघर्षात नॉर्दन अलायन्सने ३०० तालिबान्यांना ठार केल्याचंही रिपब्लिकने म्हटलं आहे.
सालेह यांनी १७ ऑगस्टला केलेल्या ट्विटमध्ये, “अफगाणिस्तानच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थिती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एफव्हीपी अर्थात फर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट देशाचा काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष होतो. मी अजून माझ्या देशातच आहे. आणि मी देशाचा कायदेशीररीत्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे”, असं अमरुल्लाह सालेह यांनी म्हटलं होतं.
स्वत: काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचं स्पष्ट करतानाच अमरुल्लाह सालेह यांनी आपण तालिबान्यांपुढे कदापि शरणागती पत्करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
“मी कधीही किंवा कोणत्याही परिस्थितीत तालिबानी दहशतवाद्यांपुढे शरणागती पत्करणार नाही. माझे हिरो अहमद शाह मसूद यांच्या आत्म्याला किंवा वारशाला मी कधीही फसवणार नाही. मला ऐकणाऱ्या लाखो लोकांचा मी कधीच अपेक्षाभंग करणार नाही. मी कधीही तालिबान्यांसोबत एकत्र राहणार नाही. कधीच”, असं अमरुल्लाह सालेह यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं होतं.
कोण आहेत सालेह?
४८ वर्षीय अमरुल्लाह सालेह हे एक माजी गुप्तहेर आहेत. सालेह यांनी अशरफ घनी यांच्याप्रमाणे देश सोडलेला नसून सध्या ते अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या भागामध्ये अजूनही तालिबान्यांचा पूर्णपणे अंमल प्रस्थापित झालेला नाही. तालिबान्यांविरोधात अफगाणी ताकद गोळा करण्याचा सालेह प्रयत्न करत आहेत. अहमद मसूद आणि माजी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलं आहे.
अहमद मसूद हे अफगाणी कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत. १९९६ ते २००१ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती. मात्र, या काळात देखील तालिबान्यांना अहमद शाह मसूद यांच्यामुळे पंजशीर खोऱ्यावर अंमल प्रस्थापित करता आला नव्हता.