“जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात.”
युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरामधून चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, पाकिस्तान, चीनबरोबरच वेगवगेळ्या देशांमधील विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडलेत. तर दुसरीकडे युक्रेनमधून १० लाख लोकांनी स्थलांतर केलंय. जगभरामधून हे युद्ध आणि त्यामुळे होणारे मृत्यू तसेच आर्थिक नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या परिस्थितीबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाष्य केलंय.
रोहित यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्या निर्णयांवर सूचक पद्धतीने भाष्य केलंय. “सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं,” असं रोहित यांनी म्हटलं आहे.https://27e3888110528e0adcd301f61bad5c8b.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.htm
“रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय,” अशी टीका रोहित यांनी केलीय.
“लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे. भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात,” असं रोहित यांनी म्हटलं आहे.