युक्रेनने आपल्या मागण्या मान्य केल्यास आपण चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाने म्हटलंय.
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तसेच युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे आपण युक्रेनशी चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याचे आरोप फेटाळत आपल्या मागण्या मान्य झाल्यास युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलंय. रशियाचे अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने म्हटले आहे की युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोटांचे वृत्त खोटे आणि बनावट आहेत. युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर प्रमुख शहरांमध्ये रशियाने हवाई हल्ला केल्याच्या बातम्या खोट्या असून आमचा अपप्रचार करण्यात येतोय, असं ते म्हणाले. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनसोबत चर्चा शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, या युद्धासंदर्भात युक्रेन आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची अट ठेवली आहे.
काय आहेत रशियाच्या मागण्या?
प्रमुख तीन मागण्या अशा की – युक्रेन तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेले राष्ट्र असावं, त्यांनी रशियाचा भाग म्हणून क्रिमियाला मान्यता द्यावी आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व मान्य करावं. याबद्दल दोन्ही देशांमधील चर्चेच्या तिसऱ्या फेरीत तोडगा निघेल, अशी आशा रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
युक्रेनमध्ये ३३१ युद्धबळी –
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाने शुक्रवारी सांगितले की २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.