अभुतपूर्व गोंधळानंतर वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी दिले आदेश
2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अजूनही राजकीय तणाव सुरुच आहे. अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष सुरू असून मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातलाय. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी स्थानीक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहिल असे आदेश दिलेत.
काय झालं ?
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात एका आंदोलनकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाल्याचं समजतं. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. दरम्यान यानंतर आता परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
’हा विरोध नव्हे देशद्रोह’
या घटनेवर निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, असं बायडेन म्हणालेत.
ट्रम्प यांचं ट्विटर-फेसबुक अकाउंट ब्लॉक
दरम्यान या घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला