Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वाबरोबर…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

गुजरातपेक्षा महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती दिल्याचा दावा केला जात आहे.

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ‘वेदान्त’ कंपनीच्या मालकांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वादहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचं सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचं जाळं पसरवण्याचा विचार असल्याचं सांगितलं.

अनिल अग्रवाल यांनी चार ट्वीट्समधून आपलं म्हणणं मांडलं आहे. पहिल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, “कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’कडून प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने वेगवगेळ्या जगांची पाहाणी सुरु होती. ही वैज्ञानिक आणि आर्थिक घटकांशी संबंधित कार्यपद्धती असून त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. आम्ही ही प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरु केली होती.”

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

“आमच्या कंपनी अंतर्गत तसेच इतर संस्थांच्या मदतीने केलेल्या पहाणीनंतर काही राज्यांची नावं पर्याय म्हणून निश्चित करण्यात आली. त्यामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूचा समावेस होता. आमचं उद्देश साध्य करण्यासाठी ही राज्यं योग्य असतील असा निष्कर्ष निघाला. मागील दोन वर्षांपासून आम्ही या राज्यांमधील सरकारांबरोबरच केंद्र सरकारच्या संपर्कात असून आम्हाला त्यांनी उत्तम पाठिंबा दिला आहे,” असंही अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

गुजरातपेक्षा महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती दिल्या होत्या. असं असतानाही हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. असं असतानाच आता अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गुजरातची निवड का करण्यात आली याबद्दलचा खुलासा केला आहे. “काही महिन्यांपूर्वी आम्ही गुजरातचं नाव निश्चित केलं. त्यांनी आम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी देऊ केल्याने ही निवड करण्यात आली. मात्र जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील नेतृत्वाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला या स्पर्धात्मक निवडीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मोठी ऑफर दिली. आम्हाला एका जागेवरुन सुरुवात करायची होती. त्यामुळेच आम्ही तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार गुजरातची निवड केली,” असा खुलासा अनिल अग्रवाल यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये केला आहे.

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी

शेवटच्या ट्वीटमध्ये लवकरच महाराष्ट्रातही गुंतवणूक करणार असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. ते लिहितात, “कोट्यवधी रुपयांची ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची दशा आणि दिशा बदलणार आहे. आम्ही देशभरामध्ये परिसंस्था उभारणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. गुजरातपासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.”

हे वाचले का?  Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?

महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे अशी घोषणा अग्रवाल यांनी केली असली तरी ती नेमकी किती आणि कशी केली जाणार आहे हे मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे.