गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थिर असलेल्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यभरात थंडी वाढण्याचा, तसेच काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरातील मोन्था आणि सेन्यार या लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांनंतर राज्यातील हवामानात पुन्हा बदल होऊन थंडी वाढली आहे. काही भागातील हवामानत चढ-उतार होत आहेत. दिवसा कमाल तापमानात वाढ, तर रात्रीच्या तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तापमान साधारण १० ते १२ अंश सेल्सियस दरम्यान कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई येथे २० ते २२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.
त्या तुलनेत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती अशा काही भागांमध्ये एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे. या भागात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सियसने तापमान घटले आहे. या पार्श्वभूमीवर आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या तीव्रतेमध्ये वाढ होऊन थंडी आणखी वाढण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारे उत्तर भारत आणि मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत, त्यामुळे पुढील काही दिवसांत रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे. तसेच निरभ्र आकाश आणि हलक्या स्वरुपाच्या वाऱ्यामुळे रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकते. उत्तर आणि मध्य भारतात, तसेच मध्य प्रदेशात काही ठिकाणी अल्प प्रमाणात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर, पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील काही दिवसांमध्ये रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज आहे. तसेच काही भागात हलके धुके दिसू शकते.
किमान तापमानात होत असलेली घट पुढील पाच ते सात दिवस कायम राहू शकते. तसेच सरासरीच्या तुलनेत तापमानात दोन अंश सेल्सियसने घट होऊ शकते. पुण्यातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. पुण्यात दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक गारवा जाणवत आहे. आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे कश्यपी यांनी नमूद केले.


