VIDEO: “अहो, रामदास कदम अजितदादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला” सचिन खरात यांची जोरदार टीका!

आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sachin Kharat on Ramdas Kadam: शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या पक्षफुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आमदारांसोबत आता शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांनी पक्षावर, उद्धव ठाकरेंवर आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता रामदास कदमांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया उमठत आहे. आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अजित पवारांविषयी तोंड सांभाळून बोला असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

शिवसेनेनं भाजपाला महाराष्ट्रात आणलं – खरात

त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “अहो, रामदास कदमजी, आपण ज्या शिवसेनेत होता, त्याच शिवसेनेचा व्यवस्थित गृहपाठ करा. भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं महाराष्ट्रात आणलं. त्यानंतर २०१४ मध्ये, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होताना तुमची काय अवस्था होती? हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मंत्रिमंडळात गेल्यानंतर भाजपानं तुम्हाला कशी वागणूक दिली? हेही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळेच तुम्ही मीडियात रोज सांगत होतात की, तुमच्या खिशामध्ये राजीनामे आहेत.”

हे वाचले का?  Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, पण तुम्ही त्यांना सोडून पळ काढला- सचिन खरात

“तुमचा सतत होणारा अपमान उद्धव ठाकरेंना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे आता तुम्हीच आत्मपरीक्षण करा, ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन तुम्ही जगता, ते एका सभेत म्हणाले होते, आता माझ्या उद्धवला सांभाळा. पण तुम्ही त्यांना सांभाळलंच नाही. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. पण तुम्ही त्याच उद्धव ठाकरेंना सोडून पळ काढला. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे” असंही खरात म्हणाले.

अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन खरात पुढे म्हणाले, “अहो रामदास कदम, अजितदादांविषयी बोलताना जरा तोंड सांभाळून बोला. कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो लावून निवडून आलात. आता खरंच तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या. मग शिवसेना कुणी संपवली? हे जनता तुम्हाला नक्कीच सांगेल.”

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान