Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

ब्रेक निकामी (फेल) झालेल्या ट्रेलरने पाच मोटारींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले.

नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक निकामी (फेल) झालेल्या ट्रेलरने पाच मोटारींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. या अपघातात पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे गस्ती पथक व रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन कसारा घाटातील धबधबा पॉइंटजवळ ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील मारुती सियाझ, ह्युंदाई, किया, मारुती बलेनो, मारुती स्विफ्ट या पाच मोटारींना धडक देत तो उलटला. या अपघातात विनीत मेहता, दिव्या मेहता, जितेश पिटाडिया, फाल्गुनी पिटाडिया हे जखमी झाले. अन्य तीन जखमींच्या नावांची स्पष्टता झालेली नाही. सर्व जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व १०८ रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खर्डी येथील जिल्हा उपरुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त मोटार खासगी क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने कसारा घाटात ठिकठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी वाहने मध्येच उभे करीत असल्याने अपघात होत आहेत. कसारा घाटातील ब्रेक निकामी होण्याच्या स्थळाजवळून (ब्रेक फेल पाँईट) पाच ते सहा वाहने रस्त्याने जात असतांना ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

घाटात उपाययोजनांची गरज

नवीन कसारा घाटात फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक, चालक या ठिकाणी गाड्या थांबवतात अथवा गती कमी करून छायाचित्र काढत असतात. तसेच उंट दरीजवळ देखील मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी करून पर्यटक छायाचित्रणासाठी जातात. परिणामी दोन्ही धोक्याच्या ठिकाणी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग