VIDEO : “…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही”, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

“…तरी मोदी बहुमतानं पंतप्रधान होतील”, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. २०१९ साली मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंनी काँग्रेसबरोबर युती केली. तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता मतदान करणार नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना चैन पडत नाही. कारण, मोदींनी देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ही पोटदुखी आणि जळफळाट आहे. कावीळ झालेल्यांकडून काय अपेक्षा करणार?”

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

“ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली, विचार आणि कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांचा कवटाळण्याचं काम ठाकरे करत आहेत. ‘काँग्रेसला गाडा’ असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. त्या काँग्रेसला डोक्यावर घेत ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. येणाऱ्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुखवटा जनता फाडून टाकेल. कारण, २१ पक्ष २०१४, २०१९ आणि आताही मोदींविरोधात एकत्र आले आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

“२०१९ साली मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंनी काँग्रेसबरोबर युती केली. तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना राहिला नाही,” अशा शब्दांत शिंदेंनी खडसावलं आहे.

“ज्या पक्षांनी बाळासाहेबांवर टीका केली. त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता मतदान करत नाही. कितीही काहीही केलं, तरी मोदी बहुमतानं पंतप्रधान होतील,” असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.