Violence in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळ जिल्ह्यात हायटेक ड्रोनने हल्ला; दोन जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Manipur Violence Kuki Militants Launch Drone Attacks In Koutruk Marathi News : मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील काही भागात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले.

Manipur Violence Latest News : गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येत आहे. मात्र, असं असतानाच आता पुन्हा मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत.

हे वाचले का?  Cabinet Meeting : नगराध्यक्षांचा कालावधी वाढवणार, यासह राज्याच्या मंत्रिमंडळात आठ महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील काही भागात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या आणि बॉम्ब हल्ल्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हाय-टेक ड्रोनचा वापर करून अनेक आरपीजी (रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड) तैनात केले आहेत, असं मणिपूर पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं असल्याचं इंडियन एक्स्प्रेसने वृत्तात म्हटलं आहे. एका गावाला लक्ष्य करण्यासाठी अशा सात स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे वाचले का?  Wayanad Landslides Update : केरळच्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २५६ वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता!

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. त्यानंतर रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर गोळीबार झालेल्या कौत्रुक या गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. कौत्रुकमधील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक घरांना आग लावण्यात आली आहे. त्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कौत्रुक गाव हे कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेजवळ मात्र, इंफाळ पश्चिम जिल्ह्यात स्थित एक मेईतेई समुदाय असलेलं गाव आहे. कौत्रुकमध्ये याआधीही अनेकदा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. हिंसाचाराच्या घटनेत या गावाला अनेकदा लक्ष्य करण्यात आलं होतं. दरम्यान, आता या घटनेनंतर रविवारी संध्याकाळी मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना जास्तीत जास्त सतर्कतेच्या आणि सर्व सीमा भागात सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या घटनेनंतर तपासाचेही निर्देश दिले असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.