Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

Vladimir Putin on India : व्लादिमीर पुतिन सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
Vladimir Putin on India and Superpower Nations : “इतर कुठल्याही देशापेक्षा भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, जागतिक महासत्तांच्या यादीमध्ये समावेश करण्यास भारत पात्र आहे”, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुतिन म्हणाले, “रशिया भारताशी सर्व बाजूंनी संबंध दृढ करीत आहे आणि दोन्ही देशांमध्ये कमालीचा विश्वास आहे. जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी एक कोटींनी वाढ होत आहे. अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, प्राचीन संस्कृती आणि आश्वासक भविष्य पाहता महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश निःसंशय व्हायला हवा”.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

रशियाचे अध्यक्ष म्हणाले, “भारत हा गेल्या अनेक दशकांपासून आमचा मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधला भागिदार राहिला आहे”. यावेळी पुतिन यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सोव्हिएत युनियनच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले, “भारताचा जागतिक महासत्तांच्या यादीत समावेश व्हायला हवा. भारत त्या सन्मानास पात्र आहे. तब्बल दीड अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाचा विकास दरही वेगवान आहे. त्यांच्याकडे प्राचीन संस्कृती आहे. त्याचबरोबर विकासाची मोठी क्षमता देखील आहे”.व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

सोची येथे वल्दाई डिस्कशन क्लबला संबोधित करताना पुतिन म्हणाले, “भारत एक महान देश आहे. या महान देशाशी आपले अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मॉस्को व नवी दिल्ली विविध क्षेत्रांमध्ये भागिदार आहेत आणि ही भागिदारी दिवसेंदिवस वाढवत आहोत. भारताचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचं सहकार्य वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यापासून उभय देशांमध्ये गुणवत्ता, विश्वास व सहकार्यामुळे अद्वितीय संबंध निर्माण झाले. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा तब्बल ६० अब्ज डॉलर्सचा आहे”.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

“आमचे संबंध एवढे घनिष्ठ की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”, मोदींबाबत पुतीन यांची मिश्किल टिप्पणी

दोन आठवड्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियातील कझान शहरात पार पडलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केलं. मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांना विशेष विशेषाधिकार आहे आणि ते गतिमानपणे विकसित होत आहेत, असं पुतिन त्यावेळी म्हणाले होते. तसेच ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की आम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, अशी मिश्किल टिप्पणी पुतिन यांनी केली. पुतिन यांच्या या टिप्पणीचा हिंदी अनुवाद ऐकून पंतप्रधान मोदीही हसले.